सौभाग्याचा साज... साताजन्माची साथ...
By Admin | Updated: June 3, 2015 01:05 IST2015-06-03T00:30:12+5:302015-06-03T01:05:32+5:30
भक्तिभावाने पूजा : वटपौर्णिमेला भरला सुवासिनींचा मेळा; वृद्धांपासून नवविवाहितांनी घडविले संस्कृती दर्शन

सौभाग्याचा साज... साताजन्माची साथ...
कोल्हापूर : सौभाग्याचे मानचिन्ह असलेली हिरवी साडी, नखशिखांत केलेला साजश्रृंगार, ठसठशीत कुंकू, फुलांची वेणी, हातात पूजेची थाळी आणि पतीसोबत साताजन्माच्या साथीची मनोकामना करत सुवासिनींनी वडाच्या झाडाचे पूजन केले. वयस्कर आजींपासून ते नवविवाहितेपर्यंत संस्कृतीचे झालेले संक्रमण यानिमित्ताने अनुभवताना वटपौर्णिमेच्या या सणाला जणू कोल्हापुरात सौभाग्यवतींचा मेळाच भरला होता.
पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीच्या कथेशी जोडली गेलेली वटपौर्णिमा म्हणजे सुवासिनींचा सण. यादिवशी महिला वडाच्या झाडाला अभिषेक, वस्त्रमाळ, आंब्याची ओटी वाहून पूजन करतात. वडाला बांधलेल्या प्रत्येक सात फेरीगणिक पती-पत्नीच्या नात्याची वीण अधिक घट्ट करत सुखी संसाराचे रोपटे असेच वृद्धिंगत व्हावे, यासाठी व्रतस्थ राहतात. पावसाळ्याचे आगमन आणि वटपौर्णिमेने सणांची सुरुवात हे महाराष्ट्रीय संस्कृतीचे वैशिष्ट्य. हा सण महिलावर्गाच्या जिव्हाळ्याचा. या आयुष्यातच नव्हे तर पुढच्या सात जन्मांत मला याच पतिसौभाग्याची साथ लाभू दे आणि पतीला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे, अशी मनोकामना या सुवासिनी वडाच्या झाडाजवळ व्यक्त करत साताजन्मांचा फेरा दोऱ्याच्या रूपाने झाडाला बांधतात.
मंगळवारी सकाळपासूनच काठापदराच्या साड्या, अलंकार आणि साजश्रृंगाराने नखशिखांत सजलेल्या महिला हातात पूजेच्या साहित्यांचे ताट घेऊन आपल्या घराच्या परिसरातील वडाच्या झाडाच्या पूजनासाठी निघाल्या. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील रामाचा पाराजवळ तर जणू सुवासिनींचा मेळाच भरला होता. वयस्कर आजींपासून ते नवविवाहितेपर्यंत संस्कृतीचे झालेले संक्रमण या ठिकाणी पाहायला मिळाले.
याशिवाय शहरातील मिरजकर तिकटी, नागाळा पार्क, वटेश्वर, आदी वडाच्या झाडाच्या पूजनासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली
होती. (प्रतिनिधी)
५वडाची रोपे जगविण्याचा ‘सखीं’चा निर्धार
कोल्हापूर : वडाच्या रोपांचे वाण एकमेकींना देत, वटवृक्ष जगविण्याचा निर्धार करीत ‘सखीं’नी ‘लोकमत सखी मंच’च्या ‘हे वाण निसर्गाचे’ या कार्यक्रमात मंगळवारी नागाळा पार्क येथील नागोबा मंदिरात सकाळी दहा ते बारा या वेळेत पारंपरिक धागा जपण्यासोबतच आगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. स्व. गोविंदराव कोरगावकर ट्रस्टच्यावतीने वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
‘सखी मंच’च्या वतीने सखींसाठी ‘पतीबरोबर घालविलेले अविस्मरणीय क्षण’ या विषयावर मनोगत व्यक्त करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. ‘सखीं’नी यावेळी आपल्या पतीच्या सहवासातील क्षणांना उजाळा दिला. स्पर्धेत सत्तर वर्षांच्या आजींपासून नवविवाहितेपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. कुणी आपल्या परदेश प्रवासाची आठवण सांगितली, तर कुणी पतींचा समजूतदारपणा सांगितला, कुणी आपल्या प्रेमविवाहाची गंमत सांगितली. उखाणे घेत, कवितेच्या ओळींचा आधार घेत सखींनी या अनोख्या स्पर्धेत चांगलीच रंगत आणली.
स्पर्धेसाठी शुभलक्ष्मी देसाई, स्मिता ओतारी यांनी संयोजन-साहाय्य केले. यावेळी शुभलक्ष्मी देसाई यांनी वर्षभरातील विविध पौर्णिमांचे महत्त्व सखींना सांगितले. या कार्यक्रमासाठी सखी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शर्मिला मोहिते, अमोल कोरगावकर यांचे विशेष साहाय्य लाभले. (प्रतिनिधी)
पर्यावरण जागरासाठी रोपांचे वाटप
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केले जाते; पण अलीकडे वडाचे झाड जवळपास नसल्याने किंवा वेळ नसल्याने वडाच्या फांद्या विकत आणून ते कुंडीत लावून दारात पुजले जाते. मात्र, यामुळे उलट पर्यावरणाचे नुकसान होतेच, शिवाय पूजेच्या नावाखाली वडाच्या झाडाची मोठ्या प्रमाणात तोड केली जाते. रोपाचे नव्हे, प्रत्यक्ष झाडाचे पूजन करा, असा संदेश देत पाचगाव रोडवरील अंजली अभ्यंकर यांच्या प्रयत्नांती पर्यावरण ग्रुपने महिलांना वडाच्या रोपांचे वाटप केले. ५ जूनला पर्यावरण दिन आणि संकष्टी चतुर्थी आहे. याचे औचित्य साधून लक्ष्मीपुरीतील स्वयंभू गणेश मंदिराच्यावतीने भक्तांना रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
झाडाचा वाढदिवस...
जुना बुधवार तालीम परिसरातील महिलांनी गतवर्षी वटपौर्णिमेला वडाचे झाड लावले होते. हे झाड वर्षाचे झाल्याने मंगळवारी सर्वांनी मिळून या झाडाचा पहिला वाढदिवस केक कापून साजरा केला. यात अमृता सावंत, आकाशी पाटील, भारती पाटील, सारिका दिंडे, विजया महाडिक, रेणू पाटील, सारिका सावंत, वासंती सावंत, वैष्णवी पाटील यांचा सहभाग होता. याशिवाय महापालिकेच्यावतीनेही वृक्ष दिनानिमित्त रामानंदनगर येथे वृक्षारोपण केले. मंगेशकर नगर, बेलबाग येथे २०११ साली लावलेल्या वडाच्या झाडाचा चौथा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाच्या रकमेतून नगरसेवक संभाजी जाधव यांनी उद्यान विभागास कटर मशीन भेट दिली. यावेळी निसर्गमित्रचे अनिल चौगुले, प्रतिभा राजेघाटगे, शरयू भोसले, विजय चरापले उपस्थित होते.