नशीब बलवत्तर म्हणूनच तो वाचला...

By Admin | Updated: March 16, 2016 23:55 IST2016-03-16T23:14:27+5:302016-03-16T23:55:16+5:30

काळ आला होता पण... : मुरगूड एस. टी. स्टॅण्डवरील चित्तथरारक घटना

Good luck as a result ... | नशीब बलवत्तर म्हणूनच तो वाचला...

नशीब बलवत्तर म्हणूनच तो वाचला...

अनिल पाटील -- मुरगूड--वेळ दुपारी साडेतीनची. ठिकाण मुरगूड (ता. कागल) मधील एस. टी. स्टॅण्ड. मंगळवार आठवडा बाजाराचा दिवस, त्यामुळेच स्टॅण्ड परिसरात गर्दी. त्यातीलच एक अपंग एस.टी.ची वाट पाहत उभा. गाडी फलाटवर लावताना तो चालकाला दिसला नाही, त्याला जोराची धडक बसली. तो खाली कोसळला; पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणूनच वाचला. नियतीचा आगळावेगळा खेळ शेकडो डोळ्यांनी पाहिला.
घडले ते असे. मुरगूडच्या एस. टी. स्टॅण्डवर बाजार असल्याने प्रवाशांची गर्दी होती. कोल्हापूर जलद गाडी आपल्या फलाटावर लावण्यासाठी चालक व वाहक दोघेही प्रयत्न करीत होते. बसमध्ये पुढच्या सीटवर बसूनच शिट्टी वाजवून वाहक चालकाला इशारा देत होता. नेमक्या त्याच गाडीच्या मागे बाजारासाठी आलेला एक अपंग प्रवासी एस. टी.ची वाट पाहत उभा होता. त्याचे लक्ष आपल्या दिशेने येणाऱ्या एस.टी.कडे अजितबात नव्हते, तसेच चालक आणि वाहकालाही तो दिसत नव्हता. त्यामुळे एस.टी.ची मागून त्या अपंग व्यक्तीला जोराची धडक बसली आणि तो खाली कोसळला. एस. टी. पूर्णपणे त्याच्या अंगावरून फलाटावर गेली होती. सुदैवाने तो कोसळल्यानंतर कोणतीही हालचाल न करता निपचिप पडून राहिल्याने त्याच्या अंगावरून चाक गेले नाही, तोपर्यंत बाजूस असणाऱ्या प्रवाशाने माणूस गावला...ऽऽ एस.टी. खाली माणूस गावला...ऽऽ अशी आरोळी ठोकली. त्यामुळे त्या एस.टी.च्या सभोवताली शेकडो लोक जमले. एव्हाना आपल्या हातून मोठी चूक झाली आहे याची कल्पना चालक आणि वाहकाला आल्याने ते पूर्णपणे बिथरले; पण उपस्थित स्टॅण्ड नियंत्रकाने बस पुढे घेण्यास सांगितले. त्यानंतर खाली निपचिप पडलेल्या त्या व्यक्तीकडे साऱ्या नजरा गेल्या. त्याची कोणतीच हालचाल नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला असावा, असा अंदाज काढून कोणीतरी रुग्णवाहिकेला फोनही केला, पण इतक्यात घाबरून निपचिप पडलेल्या त्या व्यक्तीने डोळे उघडून सर्वांवर नजर फिरविली आणि आपल्याला काही इजा झालेली नाही, असे सांगून आपल्याला उठण्यासाठी मदत करा, असे आवाहनही केले.
चालक आणि वाहक नियंत्रण कक्षामध्ये अक्षरश: भीतीने थरथरत होते; पण जेव्हा त्यांना समजले की त्या व्यक्तीला कोणतीच इजा झाली नाही तेव्हा कोठे त्या दोघांबरोबर एसटीच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हळूहळू गर्दी पांगत होती. कोण म्हणत होता, त्याची वेळच चांगली, तर कोण म्हणत होता, ‘नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला’.

Web Title: Good luck as a result ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.