प्रसादाच्या लाडू वजनातही गोलमाल
By Admin | Updated: October 20, 2015 00:21 IST2015-10-19T23:37:11+5:302015-10-20T00:21:37+5:30
ठेकेदाराला नोटीस : अवघ्या ३ ग्रॅम वजनाच्या लाडूची ५ ग्रॅम म्हणून विक्री

प्रसादाच्या लाडू वजनातही गोलमाल
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या लाडू प्रसादात संबंधित ठेकेदाराकडून भक्तांची फसवणूक केली जात आहे. तीन ग्रॅमचा लाडू ५ ग्रॅम वजनाचा म्हणून विकला जात आहे. लाडूतून काजू-बेदाणे तर गायबच आहेत, शिवाय तयार कळ््या आणून तो केला जात असून लाडू फुटून अनेक पाकिटांत केवळ कळ््या राहिल्या आहेत. याबद्दल देवस्थानमध्ये भक्तांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे देवस्थानने ठेकेदाराला सोमवारी नोटीस काढली आहे.
अंबाबाई मंदिरात देवस्थानच्यावतीने भाविकांना ५ रुपयांना लाडू प्रसाद दिला जातो. टेंडर प्रक्रियेद्वारे नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लाडूचा प्रसादाचा ठेका बदलण्यात आला व तो कमी रकमेचा असल्याने सिद्धार्थ बहुद्देशीय सेवा संस्थेला दिला गेला. मात्र, ठेकेदाराला या कामाचा पूर्वानुभव नसल्याने पहिल्या दिवसापासून लाडू प्रसादाचा तुटवडा जाणवत आहे. भाविकांना लाडू प्रसादच मिळत नाही. करारानुसार लाडू ५ ग्रॅमचा असला पाहिजे, मात्र रविवारी तर ठेकेदाराने ५ ग्रॅमचा म्हणून ३ ग्रॅमचाच लाडू पॅक करून भाविकांची फसवणूक केल्याचे आढळले आहे. या कमी वजनाच्या आणि फुटलेला लाडू प्रसाद घेऊन भाविकांनी देवस्थान समितीचे कार्यालय गाठले. गेल्या चार दिवसांत येत असलेल्या प्रचंड तक्रारींमुळे समितीने संबंधित ठेकेदाराला नोटीस काढली आहे. त्याला शक्य नसेल तर दुसऱ्या क्रमांकावर टेंडर भरले होते, त्या व्यक्तीला ठेका देण्यात येईल.