रायगडावर सापडली सोन्याची बांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST2021-04-03T04:20:51+5:302021-04-03T04:20:51+5:30
कोल्हापूर : रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला दोन दिवसांपूर्वी सोन्याची बांगडी सापडली आहे. या ...

रायगडावर सापडली सोन्याची बांगडी
कोल्हापूर : रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला दोन दिवसांपूर्वी सोन्याची बांगडी सापडली आहे. या बांगडीवर सुरेख नक्षीकाम असून, गडावर अशाप्रकारचा दागिना सापडणे ही फार मोठी गोष्ट असून, ती किती वर्षे जुनी आहे, यावर संशोधन झाले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
दुर्गराज रायगडावर प्राधिकरणामार्फत आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळाल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची मौल्यवान बांगडी मिळाली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक ऐतिहासिक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे.
शुक्रवारी खासदार संभाजीराजे यांनी रायगडास भेट देऊन उत्खननात मिळालेल्या या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. यावेळी, पुरातत्व विभागाने केलेल्या या कामगिरीबाबत त्यांचे विशेष कौतुक केले.
--
बांगडी अलीकडच्या काळातील
बांगडीबाबत इतिहासतज्ज्ञ व ज्येष्ठ सराफांना विचारले असता, त्यांनी बांगडीवरील हे सुरेख नक्षीकाम अलीकडच्या काळातील आहे. ही बांगडी म्हणजे लेसर कटिंगचा प्रकार असून, ती पूर्वी गुजरात-राजस्थानमध्ये घडवली जायची. आता महाराष्ट्रातही ही बनवली जाते. त्यामुळे ही बांगडी फार तर ५० वर्षांपूर्वींची असू शकेल, असे बांगडीच्या छायाचित्रावरून तरी दिसते. पण बांगडी नक्की कोणत्या काळातील आहे, हे कळण्यासाठी त्यावर संशोधन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
---
उत्खनन जलदगतीने व्हावे
रायगडावर ३५० वास्तू आहेत. सध्या दहा ठिकाणी उत्खनन सुरू असून, या गतीने उत्खनन झाल्यास २५ वर्षे लागतील. त्यामुळे रायगड प्राधिकरणची टीम व पुरातत्व खाते या दोघांनी मिळून उत्खनन केल्यास पुढील सात-आठ वर्षांत हे काम पूर्ण होईल, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
---
फोटो नं ०२०३२०२१-कोल-बांगडी०१,०२
ओळ : दोन दिवसांपूर्वी झालेल्या रायगडावरील उत्खननादरम्यान सोन्याची बांगडी सापडली आहे.
---