लग्नसराईत सोने-चांदी स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:07 IST2019-04-04T00:07:16+5:302019-04-04T00:07:21+5:30
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर घसरल्याने गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर तब्बल अडीच हजारांनी कमी झाले आहेत. दीड ...

लग्नसराईत सोने-चांदी स्वस्त
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर घसरल्याने गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर तब्बल अडीच हजारांनी कमी झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी ३४ हजार ४०० वर असलेले सोने बुधवारी ३१ हजार ७०० रुपयांवर आले आहे; तर चांदी ४१ हजार ८०० वरून ३७ हजार ८०० रुपयांवर आली आहे. दिवाळीपासूनचा हा नीचांकी दर आहे. ऐन लग्नसराई आणि वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कमी झालेला हा दर म्हणजे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
एप्रिल महिन्यात परीक्षा संपून सुट्ट्या सुरू होतात. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सर्वाधिक विवाह मुहूर्त असतात. विवाह म्हटले की सोन्या-चांदीच्या अलंकारांची खरेदी ओघाने आलीच. त्यातच शनिवारी हिंदू पंचांगानुसार नववर्षारंभ असलेला गुढीपाडवा आला आहे. या दिवशीची खरेदी शुभ मानली जाते.
या सण-समारंभाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा दर अडीच हजार रुपयांनी कमी झाला आहे; तर चांदीचा दर ४१ हजार ८००
रुपयांवरून ३७ हजार ८०० रुपयांवर म्हणजेच चार हजारांनी कमी झाला आहे.
दिवाळीनंतर सोन्या-चांदीचा हा नीचांकी दर आहे. गेल्या तीन महिन्यांत रोज कमी-अधिक फरकाने हा दर घसरत आहे. दीड महिन्यापूर्वी सोने दीड हजाराने घसरले होते. आता त्यात आणखी एक हजाराची भर पडली आहे; पण यात ‘जीएसटी’चा समावेश करून १० ग्रॅम वजनाच्या सोन्याचा दर ३२ हजार ६५० रुपयांपर्यंत येतो.
सध्या सुरू असलेली लग्नसराई आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त या योगावर सोन्या-चांदीच्या दरात झालेली घसरण ही ग्राहकांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे बुधवारपासून सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.