बाजार कर घोटाळाप्रकरणी कारवाई गुल - इचलकरंजी नगरपालिका : अहवाल मिळूनही निर्णय प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:08 IST2018-02-10T00:06:50+5:302018-02-10T00:08:04+5:30
इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते.

बाजार कर घोटाळाप्रकरणी कारवाई गुल - इचलकरंजी नगरपालिका : अहवाल मिळूनही निर्णय प्रलंबित
राजाराम पाटील ।
इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते. पथकाचा अहवाल महिन्यापूर्वी सादर झाला असतानाही त्याचे निष्कर्ष आणि कारवाई गुलदस्त्यातच राहिल्याने नगरपालिका क्षेत्रात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात दीपावली सण झाल्यानंतर नगरपालिकेकडे वसूल होणारा बाजार कर घटल्याची माहिती उजेडात आली. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी बाजार कराबाबत प्राथमिक चौकशी केली असता कर वसुलीमध्ये काही गैरव्यवहार होत असल्याचा संशय आला. म्हणून मुख्याधिकाºयांनी अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांच्या नियंत्रणाखाली सहाजणांचे चौकशी पथक नेमले.
चौकशी पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर बसणारे फळ विक्रेते, फेरीवाले, तसेच अनेक प्रकारच्या विविध वस्तंूची विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांकडे चौकशी केली. त्याचबरोबर मंगळवारी व शुक्रवारी थोरात चौक, विकली मार्केट, विक्रमनगर, अण्णा रामगोंडा शाळा, डेक्कन चौक, जय सांगली नाका व शहापूर याठिकाणी भरणारे आठवडी बाजार येथेही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
या चौकशीत आणि पाहणीमध्ये काही किरकोळ विक्रेते, फेरीवाले व हातगाडीवरून विक्री करणारे यांच्याकडे गेल्या काही वर्षांत कर वसुलीची पावती झालीच नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर काही ठिकाणी बाजार करासाठी आवश्यक असलेले पैसे घेऊनसुद्धा पावती दिली नाही किंवा कमी रकमेची पावती दिली, असेही अनेक प्रकार उघडकीस आले.
अशा प्रकारे बाजार कर चौकशीसाठी नेमलेल्या पथकाकडून डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष केलेले सहा वेगवेगळे अहवाल अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्याकडे सादर केले. अतिरिक्त मुख्याधिकाºयांनी या अहवालावर अभ्यास करून त्याबाबत सारांशाने निष्कर्ष काढणारा अहवाल मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे सादर केला. सदरचा अहवाल सादर करून साधारणत: महिना लोटला आहे. मात्र, त्याबाबतचे अंतिम निष्कर्ष व कारवाई अद्यापही प्रलंबित आहे.
काही फेरीवाल्यांकडे गेली अनेक वर्षे पावतीच नाही
चौकशी पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी केली असता थोरात चौकातील खाद्यपदार्थ विक्री करणाºया एका विक्रेत्याकडे गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ कर वसुलीची पावतीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच गेल्या दिवाळीमध्ये मंदीच्या कारणावरून बाजारामध्ये विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी कमी झाली होती. त्याचा परिणाम दिवाळीच्या बाजारावर झाला आणि कर वसुलीमध्ये आवश्यकतेपेक्षा जादा घट दाखविण्यात आली, असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.