नव्या पॅकिंग करारातून गोकूळचे २ कोटी वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:38+5:302021-06-18T04:17:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुंबईत दूध वितरण करण्यासाठी रोज कराव्या लागणाऱ्या ३ लाख लिटर दूधाच्या पॅकिंगचा नव्या ...

Gokul's Rs 2 crore saved from new packing agreement | नव्या पॅकिंग करारातून गोकूळचे २ कोटी वाचले

नव्या पॅकिंग करारातून गोकूळचे २ कोटी वाचले

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मुंबईत दूध वितरण करण्यासाठी रोज कराव्या लागणाऱ्या ३ लाख लिटर दूधाच्या पॅकिंगचा नव्या करारामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकूळ) एका वर्षासाठी तब्बल २ कोटी ८ लाख रुपये वाचले आहेत. गुरुवारी महानंद या सरकारी डेअरीसोबत नवा करार झाला. गोकूळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्याने ही बचत झाली आहे. यावेळी दूग्धविकास मंत्री सुनील केदार, महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख, गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या निर्णयामुळे गोकूळचा अनावश्यक खर्चाला लगाम बसलाच, परंतू महानंद या सरकारी डेअरीला ही उत्पन्नाचे नवे साधन मिळाले. दुग्धव्यवसायच्या वाढीच्या उद्देशाने गोकूळ व महानंद यापुढे भविष्यात एकत्रित काम करणार, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. विविध प्रकारची बचत करून दूध उत्पादकांस जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

मुंबईत गोकूळची रोजची सरासरी प्रतिदिन दूध विक्री ८ लाख लिटर असून संघाच्या वाशी येथील डेअरीमधून प्रतिदिन ५ लाख लिटर पॅकिंग होते. ३ लाख लिटर पॅकिंग हे इग्लू डेअरी सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडून सध्‍या प्रतिलिटर १ रुपये ६० पैसे या दराने करून घेतले जात होते. या कराराची मुदत ३१ मे २०२१ पर्यंत होती. करार नूतनीकरण करताना त्‍यांनी ९ टक्‍के (प्रतिलिटर ०.१४ पैसे) दरवाढीची मागणी केली. ही दरवाढ अवास्‍तव असूनही ते ती कमी करायला तयार नव्हते. ही बाब मंत्री सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यामध्ये महानंदकडे पॅकिंग होऊ शकते, त्यांच्याकडे ती सोय उपलब्ध असल्याचे लक्षात आले. त्यानुसार दूग्धविकास मंत्री केदार व महानंदचे अध्यक्ष देशमुख यांच्याशी चर्चा करून पॅकिंगचा करार निश्चित केला. गुरुवारी दुग्धविकास मंत्री केदार यांच्‍या दालनामध्‍ये करारपत्रावर स्वाक्षरी झाल्‍या. यावेळी महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पाटील, कार्यकारी संचालक श्‍यामसुंदर पाटील, गोकूळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर तसेच दोन्ही संघांचे अधिकारी उपस्थितीत होते.

खर्च तरीही बचतच

इग्लू या खासगी कंपनीकडून गोकूळ गेली तीस वर्षे दूधाचे पॅकिंग करून घेत होता. परंतू आतापर्यंत महानंदच्या पर्यायावर कधीच विचार झाला नाही. गोकूळची मुंबईतील डेअरी वाशीला आहे व इग्लूचे पॅकिंग व्यवस्थाही वाशीमध्येच आहे. महानंदला दूध पॅकिंगसाठी पाठवायचे झाल्यास गोरेगावला ३० किलोमीटरवर पाठवावे लागेल. त्यासाठी लिटरला ५ पैसे खर्च झाले तरी लिटरमागे १४ पैसे वाचले आहेत.

करार असा झाला..

गोकूळचे प्रतिदिन मुंबईतील पॅकिंग : ७ लाख लिटर

गोकूळची स्वत:ची पॅकिंग व्यवस्था : ५ लाख लिटर

खासगी कंपनीचा सध्याचा दर : प्रतिलिटर १.६० पैसे

खासगी कंपनीची नव्या वाढीव दराची मागणी : प्रतिलिटर ०.१४ पैसे

महानंदचा पॅकिंगचा दर : प्रतिलिटर १.५५ पैसे.

नव्या करारानुसार प्रतिलिटर वाचलेली रक्कम : ००.१९

गोकूळची सत्तांतरानंतरची बचत

१. अतिरिक्त रोजंदारी नोकर कपात ३ कोटी १२ लाख

२. टँकर वा‍हतूक ०.१७ पैसे कपातीमुळे ५ कोटी ३२ लाख

३. मुंबईतील पॅकिंग खर्चात बचतीमुळे २ कोटी ८ लाख

फोटो : १७०६२०२१-कोल-गोकूळ

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) मुंबईतील दूध पॅकिंगचा नवा करार गुरुवारी महानंद या सरकारी डेअरीसोबत झाला. त्यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, दूग्धविकास मंत्री सुनील केदार, महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख, गोकूळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगले, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पाटील, कार्यकारी संचालक श्‍यामसुंदर पाटील, गोकूळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर तसेच दोन्ही संघांचे अधिकारी उपस्थितीत होते.

Web Title: Gokul's Rs 2 crore saved from new packing agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.