‘गोकुळ’च्या दरवाढीने शेतकऱ्यांना महिन्याला आठ कोटी जादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:11+5:302021-07-11T04:18:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रचारात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी उत्पादकांना दोन ...

Gokul's price hike gives farmers an extra Rs 8 crore a month | ‘गोकुळ’च्या दरवाढीने शेतकऱ्यांना महिन्याला आठ कोटी जादा

‘गोकुळ’च्या दरवाढीने शेतकऱ्यांना महिन्याला आठ कोटी जादा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रचारात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे वचन दिले होते. सत्तांतरानंतर अवघ्या दीड महिन्यातच त्यांनी वचनपूर्ती केल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना महिन्याला आठ कोटी रुपये जादा मिळणार आहेत.

मागील संचालक मंडळाने रोज वीस लाख लीटर दूध संकलन होणार, हे गृहित धरुन आराखडा तयार करुन ‘एनडीडीबी’कडून कर्ज घेतले. मात्र, प्रत्यक्षात संकलन वाढ झालीच नाही. महिन्यापूर्वी ‘गोकुळ’मध्ये वीस लाख लीटर संकलन संकल्पाचे कलश पूजन मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे आदींच्या हस्ते करण्यात आले. सध्या १३ लाख लीटर दूध संकलन असून, वर्षाला दोन लाख लीटर दूध संकलनाचे उदिष्ट ठेवून संचालकांनी दूधवाढीचे नियोजन केले आहे.

जिल्हा बँक देणार ५०० कोटी

‘गोकुळ’च्या संकलन वाढीसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. दूध उत्पादकांना जनावरे खरेदीसाठी बँकेतर्फे विविध महामंडळांच्या माध्यमातून बिनव्याजी पाचशे कोटी दिले जाणार आहेत. भूमिहीन शेतमजुरांसाठी विनातारण कर्ज पुरवठा केला जाणार आहे.

कोट-

मुंबईसह इतर शहरांत ‘गोकुळ’च्या दुधाला मोठी मागणी आहे. लहान मुलांना ‘गोकुळ’ दुधाची इतकी गोडी लागलेली आहे, ते इतर दुधाला तोंडही लावत नाहीत. यामागे अहाेरात्र रक्ताचं पाणी आणि हाडाचं काडं करणाऱ्या दूध उत्पादकांचे कष्ट आहेत. याचे श्रेय कोणा नेत्याचे किंवा संचालकांचे नसून, शेतकऱ्यांच्या घामामुळेच ‘गोकुळ’ दुधाला गोडी आहे.

- हसन मुश्रीफ (ग्रामविकास मंत्री) (हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा)

‘गोकुळ’मध्ये चाललेल्या मनमानी कारभाराविरुद्ध संघर्षाला सुरुवात करतानाच गोरगरीब दूध उत्पादकांना न्याय देण्याची खूणगाठ बांधली होती. सकस आणि दर्जेदार दूध उत्पादन पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरीच खऱ्या अर्थाने या संघाचे मालक आहेत. म्हशीच्या दुधाला लीटरला दोन रुपये व गाईच्या दुधाला लीटरला एक रुपये दरवाढ केल्याचे निश्चितच आत्मिक समाधान आहे.

- सतेज पाटील (पालकमंत्री, कोल्हापूर) (सतेज पाटील यांचा फोटो वापरावा)

Web Title: Gokul's price hike gives farmers an extra Rs 8 crore a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.