‘गोकुळ’चे मतदान बॅलेट पेपरवर
By Admin | Updated: April 14, 2015 01:33 IST2015-04-14T01:33:21+5:302015-04-14T01:33:21+5:30
अशोक पाटील : आचारसंहितेबाबत उमेदवारांसह कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा

‘गोकुळ’चे मतदान बॅलेट पेपरवर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) बॅलेट पेपरवरच (मतपत्रिकेवर) मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांसह ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे मतदान ‘ईव्हीएम’द्वारे घेता येईल का? याबाबत चर्चा सुरू होती. सहकार प्राधिकरणाने याबाबत हिरवा कंदील दाखवला होता; पण तेवढी ईव्हीएम मशीन उपलब्ध होऊ शकत नसल्याने अखेर बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याचा निर्णय झाला आहे. येथील नागाळा पार्कमधील सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये दहा मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. एका केंद्रावर ३२० मतदान होणार आहे. सर्व उमेदवारांची बैठक घेऊन आचारसंहितेबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
संघाचे कर्मचारी, कार्यालय वापरायचे नाही, अशा सूचना देण्यात आल्या असून, प्रभाव पडेल असे निर्णय जाहीर करायचे नाहीत, असे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत. वेळेत खर्च सादर न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही अशोक पाटील यांनी सांगितले. मतदानासाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगले, सुनील धायगुडे, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)