‘गोकुळ’च्या चौकशीचे सहकारमंत्र्यांचे संकेत
By Admin | Updated: April 13, 2015 00:36 IST2015-04-13T00:34:39+5:302015-04-13T00:36:55+5:30
लेखापरीक्षण अहवाल मागविला : प्रकरण गांभीर्याने घेतले

‘गोकुळ’च्या चौकशीचे सहकारमंत्र्यांचे संकेत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) दीडशे कोटींच्या दरोड्याच्या बातम्या वाचल्या आहेत. सामान्य दूध उत्पादकांशी संबंधित हा व्यवसाय असल्याने आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, लेखापरीक्षणाचा अहवाल मागितला आहे. हलगी वाजवून कोणी दरोडा टाकला, हे येत्या दोन-तीन महिन्यांत दिसेल, असे सांगत सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘गोकुळ’च्या चौकशीचे संकेत दिले आहेत. कोल्हापूर येथे रविवारी शासकीय विश्रामगृहावर निवडक पत्रकारांशी मंत्री पाटील बोलत होते. ‘गोकुळ’ निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कडाडून हल्ला चढविला जात आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या लेखापरीक्षणातील ठपक्यानुसार सत्तारूढ कारभारी मंडळींनी हलगी वाजवून १५० कोटींचा दरोडा घातल्याचा घणाघाती आरोप केला होता. या आरोपाने सामान्य दूध उत्पादकांचे डोळे पांढरे झाले आहेत. याबाबत सहकारमंत्री म्हणून आपली भूमिका काय असणार, असे मंत्री पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘गोकुळ’चा लेखापरीक्षण अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव यांच्याकडे मागितला आहे. तो येताच पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.
‘गोकुळ’वर सामान्य दूध उत्पादकाचे जीवन अवलंबून आहे. निवडणुकीतील आरोप -प्रत्यारोपांचा फारशा गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही; पण लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार कोणी आरोप करीत असतील, तर त्याची दखल घ्यावीच लागेल. वृत्तपत्रांतून दरोड्याबाबत सविस्तर वाचले आहे. अहवाल मागितला असून त्यावर काय करतो हे येत्या दोन-तीन महिन्यांत आपणाला समजेल, असे ‘गोकुळ’च्या चौकशीचे संकेत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, नगरसेवक आर. डी. पाटील, नाथाजी पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)