‘गोकुळ’मध्ये हातकणंगले-शिरोळला वाली कोण?
By Admin | Updated: May 6, 2015 00:16 IST2015-05-05T21:11:16+5:302015-05-06T00:16:44+5:30
दोन्ही तालुक्यांना संधी नाही : वीस वर्षांपासून प्रतिनिधी न देण्याची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा

‘गोकुळ’मध्ये हातकणंगले-शिरोळला वाली कोण?
दत्ता बिडकर - हातकणंगले -मोठ्या प्रमाणात झालेल्या क्रॉस व्होटिंगचा फटका हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याला बसल्यामुळे ‘गोकुळ’मध्ये हातकणंगले-शिरोळ तालुका पोरका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांचा पराभव नेतेमंडळींच्या गेम राजकारणाचा फटका असून, क्रॉस व्होटिंगमुळे हातकणंगले-शिरोळचा गेल्या वीस वर्षांत प्रतिनिधी नसण्याचा खेळ यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
हातकणंगले तालुक्यात ७६ आणि शिरोळ तालुक्यात १२९ मतदार असूनही जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मोठ्या मतदार संस्थेच्या जोरावर या दोन तालुक्यांतील उमेदवाराला कोंडीत पकडत पराभूत करण्याचे राजकारण ‘गोकुळ’च्या निवडणुकीत यशस्वी झाल्याची चर्चा दोन तालुक्यांत सुरू आहे. ‘गोकुळ’चे नेतृत्व आमदार महादेवराव महाडिक करीत आहेत. हातकणंगले हा त्यांचा होम ग्राऊंड तालुका असल्यामुळे गेली दहा-पंधरा वर्षे शिरोळ तालुक्याला प्रतिनिधित्व दिले जात होते. यावेळी हातकणंगले तालुक्याला संधी मिळेल, अशी परिस्थिती होती. मात्र, सत्ताधारी गटाकडून अर्ज दाखल केलेले विश्वासराव इंगवले यांचा अर्जच दुधाची अट पूर्ण करीत नसल्याच्या कारणास्तव छाननीत बाद ठरवण्यात आला. अखेर गोकुळ दूध संघात सुपरवायजर असलेले विश्वासराव इंगवले ‘इतके अज्ञानी कसे?’, असा प्रश्न मतदारांना पडला असताना उमेदवारीमध्येच नेतेमंडळींनी गेम करून विश्वासराव इंगवले यांचा गेम केल्याची चर्चा सभासदांमध्ये होती.
‘गोकुळ’च्या राजकारणात दोन तालुके पोरके झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. दिलीप पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नातेवाईक असल्याने ते चेअरमन होत असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे दिलीप पाटील यांना नाईलाजास्तव चेअरमन करावे लागल्याचे अन्य नेतेमंडळींना सलत होते. म्हणूनच नेतेमंडळींनी दिलीप पाटील यांचा गेम केल्याची चर्चा असून, दिलीप पाटील यांचा पराभव झाल्यामुळे दोन्ही तालुक्याला यापुढे वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
करवीर, राधानगरी, कागल, भुदरगडचे सभासद जादा असल्यामुळे त्यांचा वरचष्मा राहिला. मात्र, हातकणंगले ७३ व शिरोळ १२९ असे २०५ सभासद ठराव असताना दोन तालुक्यांचा एक प्रतिनिधी असताना विद्यमान चेअरमन दिलीप पाटील यांचा पराभव दोन्ही तालुक्यांच्या जिव्हारी लागला आहे.