दूध संकलनात ‘गोकुळ’ देशात अव्वल

By Admin | Updated: November 9, 2016 23:25 IST2016-11-09T23:00:38+5:302016-11-09T23:25:58+5:30

पी. एन. पाटील : गोगवे येथील दूध शीतकरण केंद्रावर दुग्धकलशाचे पूजन उत्साहात

Gokul tops in milk procurement | दूध संकलनात ‘गोकुळ’ देशात अव्वल

दूध संकलनात ‘गोकुळ’ देशात अव्वल

बांबवडे : दूध संकलनाच्या बाबतीत देशात अव्वल असलेला व सभासदांना ७४ कोटी लाभांश वाटणारा ‘गोकुळ’ हा एकमेव संघ असून, सभासद, कर्मचारी व अधिकाऱ्यांचे योगदान तसेच चोख कारभाराचेच हे प्रतीक असल्याचे प्रतिपादन ‘गोकुळ’चे नेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केले.
गोगवे येथील दूध शीतकरण केंद्राने एक लाख संकलनाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल दुग्धकलश पूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक संचालक विश्वास जाधव यांनी केले.
यावेळी बोलताना पी. एन. पाटील म्हणाले, या चिलिंग सेंटरचे ५० हजार लिटर प्रतिदिन संकलन क्षमता होती, ती आता एक लाखापर्यंत पोहोचली, ही अभिमानाची बाब असून, ही क्षमता दोन लाखांच्या घरात पोहोचविण्याच्या दृष्टीने व या केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, या संघाच्या प्रगतीमध्ये शाहूवाडी, पन्हाळ्याचे संचालक, येथील दूध उत्पादक, कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. या सेंटरचे लवकरच आधुनिकीकरण करून कोकणात जाणारे दररोजचे ३० हजार लिटर दूध या केंद्रातच पॅकिंग करून पाठविले जाईल.
आमदार सत्यजित पाटील म्हणाले, शाहूवाडी पन्हाळासारख्या दुर्गम भागातून दूध संकलन होऊन एक लाखांचा टप्पा पार करते, ही बाब संघाच्या दृष्टीने अभिमानाची आहे. यावेळी ‘गोकुळ’च्या संचालक अनुराधा पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संचालक जयश्री चुयेकर, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, उदय पाटील, डी. जी. पाटील, दत्ता राणे, निवास पाटील, नामदेव पाटील, एन. के. जगताप, हंबीरराव पाटील, सुभाष जामदार, तानाजी चौगुले, रामचंद्र कोकाटे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Gokul tops in milk procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.