‘गोकुळ’ने गायीच्या दुधाला २७ रुपये दर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:41 IST2018-07-01T23:41:13+5:302018-07-01T23:41:19+5:30

‘गोकुळ’ने गायीच्या दुधाला २७ रुपये दर द्यावा
कोपार्डे : अतिरिक्त ऊस झाला तरी कुंभी-कासारी कारखान्याने तो गाळप करण्यासाठी नाकारला नाही. साखरेचे दर घसरले म्हणून शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिलाच; पण अतिरिक्त दूध झाले व दूध दर कमी झाले म्हणून ते स्वीकारणार नसल्याचे जाहीर करणाºया गोकुळ दूध संघाचा एक संचालक कुंभी कारखान्यावर चुकीचे आरोप करत आहे. हिंमत असेल तर दुधाला शासनाने जाहीर केलेला २७ रुपये दर द्यावा, असे आव्हान देत आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांंचे नाव न घेता टीका केला.
कोपार्डे (ता. करवीर) येथे झालेल्या कुंभी-कासारी संचालक मंडळ संपर्कदौºयात आ. नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी तंटामुक्त संघटनेचे अध्यक्ष भिवा पाटील होते.
आमदार नरके म्हणाले, विरोधकांची सन २००० ते २००४ या काळात कारखान्यावर सत्ता होती या काळात पाच अध्यक्ष व त्यांनी केलेला कारभार आजही सभासद विसरलेले नाहीत. एकवेळ तर केवळ १८ रुपयांचा हप्ता काढून चेष्टा केली. आम्ही साखरेचे दर एफआरपीपेक्षा ५०० रुपये कमी असताना एक महिना गाळप झालेल्या उसाचे एकरकमी तर उरलेल्या उसाची दोन हप्त्यात एफआरपी भागवली पण शिक्षण संस्थांच्या आडून ‘गोकुळ’चे संचालक नेत्यांच्या खुशालीसाठी ‘कुंभी’वर आरोप करत बदनामी करत आहेत.
शासनाने गायीचा २७ रुपये प्रति लिटर दर जाहीर केला असताना तो २३ रुपये दिला जातोय. म्हैस दूध ३५ रुपयाने खरेदी करून ५४ रुपयाने विकता. मग खरेदी व विक्रीतील २० ते २२ रुपये कुणाच्या खिशात जातात, असा थेट सवाल केला.
पी. एन. पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले, ज्यांचे नेतृत्व मानता त्या नेत्याकडे असलेल्या भोगावती कारखान्यावर एफआरपी थकली म्हणून जप्तीची नोटीस काढली, त्या कारखान्यावर बोला.
यावेळी संचालक निवास वातकर यांनी ‘गोकुळ’मध्ये सीमाभागात १७ रुपये दराने दूध मिळतय म्हणून जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध नाकारले जात आहे. दूध उत्पादन खर्चात वाढ झाली असताना पाच रुपये दर कमी करून शेतकºयांना ठकवले जात आहे. आता ‘गोकुळ’वर घामाच्या दामासाठी फावडी मोर्चा काढणार असून आमदारकी मिळविण्यासाठी नरके घरण्याची बदनामी खपवून घेणार नाही, असा दम ही दिला. प्रास्ताविक संचालक विलास पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष अॅड. बाजीराव शेलार, सर्व संचालक, व्ही. जी. पाटील, पोलीस पाटील जालिंदर जामदार, बाजीराव पाटील उपस्थित होते. आभार प्रा. ए. डी. पाटील यांनी मानले.
अरूण नरके, चुयेकरांना ‘गोकुळ’मध्ये किंमत नाही
दूध दराचा विषय काढला की तुमच्या काकांना विचारा म्हणणाºया कारभाºयांनी ज्यांनी ‘गोकुळ’ला देशपातळीवर पोहोचवले त्या अरुण नरके व चुयेकरांना किंमत दिली जाते काय. एकवेळ अरुण नरकेंचा सल्ला घ्या मग शेतकºयांचे भले होईल, असा टोला पी एन. व महाडिक यांचे नाव न घेता हाणला.
मौनी महाराज नेते
आपले सहकारात हात बरबटलेले असून एकही संस्था सुस्थितीत नसणाºया मौनी महाराज व्रत घेणाºया नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सल्ला द्यावा, अशी खिल्ली पी. एन. पाटील नाव न घेता उडवली.
हिंमत असेल तर ‘गोकुळ’ने २७ रुपये दर द्यावा
जशी उसाला एफआरपी मागताय ती आम्ही दिली. आता दुधाची २७ रुपये शासनाची एफआरपी ‘गोकुळ’ने द्यावी, असे आव्हान दिले.