‘गोकुळ’च्या सत्ताधारी पॅनेलमध्ये चंदगडला प्रथमच दोन जागा
By Admin | Updated: April 10, 2015 23:52 IST2015-04-10T21:35:25+5:302015-04-10T23:52:43+5:30
बदललेल्या परिस्थितीचा लाभ : दीपक पाटील, राजेश पाटील यांना उमेदवारी, विरोधी पॅनेलमध्ये सुरेशराव चव्हाण-पाटील

‘गोकुळ’च्या सत्ताधारी पॅनेलमध्ये चंदगडला प्रथमच दोन जागा
नंदकुमार ढेरे - चंदगड -‘गोकुळ’ दूध संघाला चंदगड तालुक्यातून प्रथमच दोन उमेदवारांना सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी का होईना, चंदगड तालुक्यातील दूध उत्पादकांची मागणी पूर्ण झाली आहे. विद्यमान संचालक दीपक पाटील व राजेश पाटील यांना सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात यापुढे वेगळी समीकरणे मांडली जाणार असल्याचे संकेत आहेत.‘गोकुळ’च्या उमेदवारीसाठी सर्वजण आग्रही असतात. आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात माजी मंत्री सतेज पाटील, विनय कोरे, प्रा. संजय मंडलिक व नाराज कार्यकर्त्यांची आघाडी, अशी लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी राहिली नाही. विधानसभेच्या निकालाची पुनरावृत्ती ‘गोकुळ’च्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात आता जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींना चंदगड तालुक्याचे सहकार्य लाख मोलाचे वाटत आहे. ज्याच्याकडे जास्त ठराव त्याला उमेदवारीचा पायंडा राजेश पाटील यांनी ‘गोकुळ’ची उमेदवारी मिळवित मोडीत काढला आहे. चंदगड तालुक्यामध्ये ३२२ संस्था मतदानाला पात्र आहेत. यापैकी विद्यमान संचालक दीपक पाटील यांच्याकडे २०५, तर राजेश पाटील यांच्यासह गोपाळराव पाटील, सुरेश चव्हाण-पाटील व राष्ट्रवादीकडे ११७ ठराव आहेत, असे चित्र आहे. तालुक्यामध्ये ‘गोकुळ’च्या स्थापनेपासून संचालकपद नव्हते. त्यानंतर ‘गोकुळ’मध्ये मारुती कांबळे यांनी सर्वप्रथम, त्यानंतर महादेव कांबळे, नामदेव कांबळे यांनी संचालकपद भूषविले. माजी मंत्री भरमू पाटील यांचे पुत्र दीपक पाटील यांनी सलग दोनवेळा ‘गोकुळ’चे संचालकपद मिळविले. आता तिसऱ्यांदाही ते रिंगणात आहेत. माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे पुत्र, तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांना प्रथमच संधी देऊन आमदार महादेवराव महाडिक यांनी वेगळाच डाव खेळल्याचीचर्चा आहे. राजेश पाटील यांना उमेदवारी मिळण्यास जिल्ह्यातील बदललेले राजकारणही कारणीभूत आहे. प्रा. संजय मंडलिक हे राजेश पाटील यांचे मेहुणे असल्याने, जरी ते विरोधी पॅनेलला पाठिंबा देत असले, तरी काही क्रॉस मते राजेश पाटील यांना मिळतील, असे काहीसे गणित मांडले जात आहे. ‘शत्रूचा-शत्रू तो आपला मित्र’, याची या निवडणुकीत प्रचिती येताना दिसत आहे.विधानसभेत खासदार व आमदारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना यावेळी ‘गोकुळ’मध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये सर्वकाही चालते; पण कार्यकर्त्यांनी काही केले की तो कार्यकर्ता बाद, असा शिक्का मारला जातो. मात्र, या निवडणुकीत कार्यकर्त्यांपेक्षाही नेत्यांचे सोयीस्कर राजकारण जनता अनुभवत आहे.