‘गोकुळ’तर्फे पशुधनाच्या आॅनलाईन नोंदी
By Admin | Updated: March 14, 2016 00:08 IST2016-03-13T23:32:08+5:302016-03-14T00:08:42+5:30
‘इनफ’ सॉफ्टवेअर : एक एप्रिलपासून पाच लाख दुभत्या जनावरांंची माहिती एका क्लिकवर

‘गोकुळ’तर्फे पशुधनाच्या आॅनलाईन नोंदी
प्रकाश पाटील -- कोपार्डे --नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी)कडून पशुधनाची आॅनलाईन माहिती मिळावी यासाठी ‘इनफ’ (इन्फॉर्मेशन नेटवर्क फॉर अॅनिमल प्रॉडक्टिव्हिटी अँड हेल्थ) या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रात या सॉफ्टवेअरचा वापर राज्यात प्रथमत: ‘गोकुळ’कडून केला जाणार आहे. याची सुरुवात एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जनावरांचे आरोग्य, त्यांची संख्या यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे.
‘इनफ’ या सॉफ्टवेअरप्रणाली अंतर्गत एक क्रमांक ‘कोड’ म्हणून वापरला जाणार आहे. हा ‘कोड’ या जनावरांची ओळख असेल. संघाच्या ६० पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना नेटपॅड अथवा लॅपटॉप देऊन सॉफ्टवेअरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी संबंधित जनावरांची तपासणी करेल. त्यावेळी काय तपासणी केली, दिलेली लस, जंतू निर्मूलनासाठीचे उपाय, तारीख व वेळ यांची नोंद या सॉफ्टवेअरमध्ये ताबडतोब केली जाईल. रोगांपासून बचाव करण्यासाठी कोणती औषधे, प्रमाण, कंपनी यांची तपशिलवार माहिती या सॉफ्टवेअरमध्ये नोंदविली जाणार आहे. संबंधित जनावरांची पुढची तपासणी कधी अपेक्षित आहे, यांची नोंद केली जाईल. त्या तारखेला शेतकऱ्याला त्याची आठवण करून दिली जाणार आहे. ही सर्व माहिती कोणालाही पाहता येणार आहे.
माहिती भरताना संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असणार आहे. यामुळे या अधिकाऱ्याने किती जनावरांची तपासणी केली, त्याने कोणकोणती प्रतिबंधात्मक औषधे दिली, किती प्रमाणात दिली, कोणत्या भागात दिली, याचीही माहिती मिळणार आहे.
या प्रणालीचा उपयोग केवळ नोंदीच ठेवण्यासाठी नाही, तर साथीचे आजार ओळखण्यासाठीही होणार आहे. प्रत्येक गाववार नोंदी यामध्ये असल्यामुळे एखाद्या गावात विशिष्ट आजार झालेली अधिक जनावरे आढळल्यास अशा साथीच्या रोगांना त्यामुळे प्रतिबंध करता येणार आहे.
एका क्लिकवर
मिळणार माहिती
प्रत्येक जनावराचा डेटा एका क्लिकवर समजणार असल्याने जनावरांचे संपूर्ण लाईफसायकल दिसणार आहे. यामुळे काही वर्षांनी एखाद्या जनावराला आजार झाल्यास यापूर्वी कोणत्या वेळी त्याला कोणता आजार झाला होता आणि त्यांच्यावर कोणते औषधोपचार केले होते, हे समजणार आहे. या अनुषंगाने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुलभता येणार आहे.
‘गोकुळ’ने वासरू संगोपन कार्यक्रमांतर्गत साडेतीन लाख जनावरांचे टॅगिंग करून आॅनलाईन माहिती एकत्र केली आहे. ‘एनडीडीबी’च्या ‘इनफ’ या सॉफ्टवेअरचा वापर ‘गोकुळ’ दूध संघ एक एप्रिलपासून करणार आहे. याचा मुख्य रिमोट ‘एनडीडीबी’च्या आनंद येथील मुख्य कार्यालयात असणार आहे.
- डॉ. प्रकाश दळवी,
वरिष्ठ अधिकारी पशुधन गोकुळ.