‘गोकुळ’चे मतदान २० एप्रिलला

By Admin | Updated: March 12, 2015 00:59 IST2015-03-12T00:53:32+5:302015-03-12T00:59:38+5:30

मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

Gokul poll for 20th April | ‘गोकुळ’चे मतदान २० एप्रिलला

‘गोकुळ’चे मतदान २० एप्रिलला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)साठी २० एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी (दि. १७) जाहीर होऊन त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. माघारीची मुदत ४ एप्रिलपर्यंत आहे. ‘गोकुळ’ दूध संघाची अंतिम मतदार यादी ७ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर दहा दिवसांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी मतदान, मतमोजणी या सर्व यंत्रणेचे नियोजन करावे लागते. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन-तीन अधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. १७ ते २३ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत आहे. त्यातील एक रविवार, २० मार्चला अमावास्या व २१ रोजी गुढीपाडवा हे तीन दिवस आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवसच मिळणार आहेत. २४ मार्चला छाननी, तर २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे. २० एप्रिलला तालुक्याच्या ठिकाणी मतदान होणार असून, २१ एप्रिलला मतमोजणी होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सत्तारूढसह विरोधकांनी निवडणुकीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. सत्तारूढ गटाचा ठरावधारकांशी संपर्क आहेच; पण विरोधकांनीही जोरदार तयारी केली आहे. ठरावधारकांच्या भेटीगाठींबरोबर इच्छुकांचीही त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. सत्तारूढ गटाचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. या गटाच्या पॅनेलवर विरोधी पॅनेलची रचना राहणार आहे. सत्तारूढ गटातील एखादा ‘नाराज’ हाताला लागतो काय, यावर विरोधकांची नजर आहे. सध्या ठरावांच्या संख्येवरून निवडणूक एकतर्फी वाटत असली तरी सत्तारूढ गटाला ती तितकीशी सोपी नाही. सत्तारूढ गटांतर्गत असलेल्या कुरबुरी, विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणाचे थेट परिणाम या निवडणुकीत दिसणार आहेत. गेल्या निवडणुकीत २७०० पैकी २२०० ठराव सत्तारूढ गटाकडे असतानाही त्यांच्या काही उमेदवारांची दमछाक उडाली होती.(प्रतिनिधी)


निवडणूक कार्यक्रम असा :
१७ ते २३ मार्च - उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ४२४ मार्च - छाननी
२५ मार्च ते ४ एप्रिल - माघार
२० एप्रिल - मतदान
२१ एप्रिल - मतमोजणी

Web Title: Gokul poll for 20th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.