‘गोकुळ’च्या अधिकाऱ्याचा तणावाने मृत्यू !
By Admin | Updated: November 12, 2015 00:33 IST2015-11-12T00:33:51+5:302015-11-12T00:33:51+5:30
उलटसुलट चर्चा : भेटवस्तू वाटपासाठी सुटीदिवशी कामावर

‘गोकुळ’च्या अधिकाऱ्याचा तणावाने मृत्यू !
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) सहायक दूध संकलन अधिकारी अमरसिंह विजयसिंह रणनवरे (वय ५३, रा. पाचगाव, ता. करवीर) यांचा ताराबाई पार्कातील कार्यालयात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने नातेवाईक, अधिकारी व कर्मचाऱ्यांतून हळहळ व्यक्त झाली.
दरम्यान, होऊ घातलेल्या निवडणुकीतील संपर्क मोहिमेचा भाग म्हणून एका नेत्याने सुटी असूनही संघाच्या निवडक कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वाटपासाठी कामावर बोलविले होते. रणनवरे यांच्याकडे या निवडणुकीतील मतदार असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना भेटवस्तू देण्याची जबाबदारी होती. या भेटवस्तू वेळेत पोहोच करण्याच्या सक्त सूचना होत्या, त्यात रणनवरे यांना सणांमुळे कार्यालयास येण्यास उशीर झाला. तोपर्यंत अन्य सहकारी भेटवस्तू घेऊन निघून गेले होते. उशीर झाल्यामुळे आपल्याला कोण कांही बोलेल का या विचाराने तसेच सणादिवशी (पान १ वरून)
कामावर यावे लागल्याने ते तणावाखाली होते. त्यातूनच त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसला असल्याची चर्चा संघाच्या कर्मचाऱ्यांत होती. कांही कर्मचाऱ्यांनी त्यास स्पष्ट शब्दात दुजोरा दिला. त्यामुळे नेत्यांच्या निवडणूकीने एका अधिकाऱ्याचा जीव गेल्याची चर्चा सगळीकडे होती. यानिमित्ताने नेत्यांच्या खासगी कामासाठी संघाच्या कर्मचाऱ्यांचा वापर हा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.
रणनवरे हे मूळचे कागल तालुक्यातील शेंडूरचे. ‘गोकुळ’ मध्ये ३२ वर्षांपूर्वी सुपरवायझर ते म्हणून रुजू झाले होते. सध्या ते ताराबाई पार्क मुख्यालयात सहायक संकलन अधिकारी होते. त्यांच्याकडे हातकणंगले- वाळवा कार्यक्षेत्र होते. पाचगाव येथे ते कुटुंबासह राहत होते. त्यांची पत्नी खासगी शाळेत शिक्षिका आहेत. मुलगी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये आॅटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेते. संघाच्या कार्यालयास मंगळवार व आज बुधवारी दिवाळीची सुटी होती; पण महत्त्वाच्या कामानिमित्त ते बुधवारी सकाळी दहा वाजता कार्यालयात आले. काम करीत असताना त्यांना छातीत जळजळ होण्याचा त्रास सुरू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ते कार्यालयात खुर्चीवर बसून इतर सहकाऱ्यांसमवेत बोलत असतानाच अचानक बेशुद्ध झाले. कार्यालयातील सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने ‘सीपीआर’मध्ये आणले. तिथे संघाच्या कर्मचाऱ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. सगळे तणावाखाली होते. या ठिकाणी उपचारांपूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर लगेचच संघाच्या कर्मचाऱ्यांनीच रणनवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागरात नेला. त्यांची ‘पत्नी व मुलगी येवू दे..’ असे कांहीजण म्हणत होते. परंतू त्या शवागरात येवून पाहतील असे सांगून मृतदेह हलविण्यात आला. त्यामुळे पत्नी व मुलीस शवागरात जावून अंत्यंदर्शन घ्यावे लागले. मृतदेह हलविण्याची एवढी घाई का करण्यात आली अशीही चर्चा ‘सीपीआर’मध्ये होती.
दरम्यान, त्यांच्या पत्नी व मुलीला फोनवरून ‘सीपीआर’मध्ये बोलावून घेतले गेले. त्या २.४५ वाजण्याच्या सुमारास तिथे आल्या. दोघींना त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रणनवरे हे मनमिळावू व शांत स्वभावाचे असल्याने कर्मचाऱ्यांना ते आपलेसे वाटत होते. या घटनेची शाहूपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली. रणनवरे यांच्यावर कागल येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी) --
मृत्यूची चौकशी करा : सतेज पाटील
आमदार महादेवराव महाडिक यांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतील मतदारांना भेटवस्तू देण्यासाठीच ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांना सुटी असतानाही अमरसिंह रणनवरे यांना सुटीदिवशी कामावर बोलावले होते. त्या तणावातूनच त्यांचा मृत्यू झाल्याने या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. संघाच्या सुपरवायझरनी आपल्या सहकाऱ्याचा निवडणुकीपायी मृत्यू झाल्याचे भान ठेवावे व या घटनेला वाचा फोडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
-सुट्टीदिवशी का बोलवले..?
संघाचे व्यवस्थापन व पदाधिकारीही रणनवरे यांचा मृत्यू नैसर्गिकच आहे असे सांगत असले तरी दिवाळीची सुट्टी असताना ठराविक कर्मचाऱ्यांना कार्यालयात का बोलवून घेतले या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही.
दिवाळी दिवशीच दु:खद घटना
अमरसिंह यांचे कागलमध्येही घर आहे. त्या ठिकाणी धाकट्या भावाची पत्नी व मुलगा राहतात. त्यांच्या भावाचे आठ वर्षांपूर्वी निधन झाल्याने या कुटुंबाचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. दुपारी लक्ष्मीपूजन करून पत्नी व मुलगीला घेऊन ते कागलला जाणार होते. दिवाळीदिवशीच या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
संघाच्या कर्मचाऱ्यांना मंगळवार व आज बुधवारी सुटी आहे; परंतु रणनवरे यांना अध्यक्षांनी चर्चेसाठी बोलविले होते असे मला समजले. याबाबत मला अन्य कांही माहिती नाही.
- डी. व्ही. घाणेकर,
व्यवस्थापकीय संचालक गोकुळ दूध संघ्
सुटी असूनही रणनवरे यांना मीच कामासाठी बोलविले होते हे खरे आहे. त्याबाबत सुरू असलेली अन्य चर्चा निराधार आहे. व ती पत्रकारांच्याच डोक्यातून आली आहे. त्याबद्दल मला कांही बोलायचे नाही.
- विश्वास पाटील
अध्यक्ष, गोकुळ दूध संघा