पंचगंगा प्रदूषणाशी ‘गोकुळ’चा संबंध नाही
By Admin | Updated: July 13, 2014 00:42 IST2014-07-13T00:39:36+5:302014-07-13T00:42:42+5:30
दूध संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांची माहिती

पंचगंगा प्रदूषणाशी ‘गोकुळ’चा संबंध नाही
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रकल्पाच्या शेजारील नाल्याचा पंचगंगेच्या नाल्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ‘गोकुळ’मुळे पंचगंगा प्रदूषित होत असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
पंचगंगा प्रदूषणाबाबत ‘गोकुळ’सह इतर उद्योग बंद करण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत डोके यांनी काल, शुक्रवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. याबाबत ‘गोकुळ’च्या प्रशासनाने आज, शनिवारी आपली भूमिका मांडली.
‘गोकुळ’ प्रकल्प येथे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्यामार्फत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा १४ लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प १९८५ पासून कार्यरत आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ हाताळणीसाठी कोणतेही केमिकल वापरले जात नाही. सांडपाणी प्रकल्पामध्ये बॅक्टेरिया व मशिनरीद्वारे पाणी स्वच्छ केले जाते. हे पाणी परिसरातील बगीच्यासाठी वापरले जाते. त्याचबरोबर संघाने हे पाणी मागणीनुसार स्वखर्चाने शेतकऱ्यांना दिले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ‘गोकुळ’ प्रकल्पास भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार संघाने त्या त्या वेळेला त्वरित कार्यवाही करून प्रदूषण मंडळास वेळोवेळी उत्तर दिले असल्याचेही डी. व्ही. घाणेकर यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)