‘गोकुळ’ बातमी जोड....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:38+5:302021-05-05T04:41:38+5:30
स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या कन्या सुस्मिता राजेश पाटील या महिला गटातून, तर मंडलिक यांचे नातू वीरेंद्र हे सर्वसाधारण गटातून ...

‘गोकुळ’ बातमी जोड....
स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या कन्या सुस्मिता राजेश पाटील या महिला गटातून, तर मंडलिक यांचे नातू वीरेंद्र हे सर्वसाधारण गटातून पराभूत झाले. एकाच पॅनेलमधील आत्या, भाच्यांचा पराभव झाला.
नरके बंधूंसह चौघे पाहुणे विजयी
अजित नरके व चेतन नरके हे चुलत बंधू विजयी झाले; तर त्यांचे पाहुणे अमर पाटील व शशिकांत पाटील-चुयेकर यांनीही बाजी मारली. त्यामुळे नरके-पाटील कुटुंबातील चौघे संचालक मंडळात दिसतील.
गडहिंग्लज पुन्हा मोकळा
मागील निवडणूणुकीत गडहिंग्लजमधील सत्तारूढ गटातून सदानंद हत्तरकी, तर विरोधी गटातून बाळासाहेब कुपेकर पराभूत झाले होते. या वेळेला दोन्ही आघाड्यांनी दोन-दोन जागा दिल्या होत्या. मात्र एकही जागा निवडून आली नाही. त्याचबरोबर चंदगड तालुकाही संचालकांविना राहिला आहे.
‘गोकुळ’च्या दारात जल्लोष
विरोधी आघाडीने १७ जागांवर विजयी मिळविल्यानंतर समर्थकांनी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या दारात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
किसन चौगले यांची मुसंडी
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी किसन चौगलेे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली होती. त्यांनी दोन महिने जिल्हा पिंजून काढलाच, त्याशिवाय स्वत: ए. वाय. पाटील यांनी लावलेल्या जोडण्यांमुळे १८८९ मते घेतली.
चंद्रदीप नरके, कोरे यांचे १०० टक्के यश
माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या अजित नरके व एस. आर. पाटील या दोन्ही जागा, तर आमदार विनय कोरे यांचे कर्णसिंह गायकवाड व अमर पाटील हे विजयी झाले. नरके, कोरे यांना शंभर टक्के यश मिळाले.
करवीरमधील सहा, तर पन्हाळ्यातील तीन संचालक
करवीर तालुक्यात विश्वास पाटील, प्रकाश पाटील, एस. आर. पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर व बाळासाहेब खाडे असे सहा संचालक निवडून आले. पन्हाळ्यात अजित नरके, चेतन नरके व अमर पाटील यांच्या रूपाने तीन संचालक पदे मिळाली.
गुरबेंची शेवटपर्यंत निकराची झुंज
पालकमंत्री सतेज पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विद्याधर गुरबे (गडहिंग्लज) यांनी विजयी सोळा जणांच्यात येण्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर १८ मतांनी त्यांचा पराभव झाला. विरोधी आघाडीतील प्रकाश पाटील यांची पाठलाग करीत आले होते.
राजकीय ईर्षेतून उमेदवारी घेतलेल्या भाटलेंचा पराभव
राधानगरीतून राजाराम भाटले यांच्यासाठी महादेवराव महाडिक यांनी आग्रह धरून उमेदवारी दिली. मात्र तालुकांतर्गत राजकारणाचा त्यांना फटका बसल्याने तब्बल ३४३ मतांनी त्यांचा पराभव झाला.
कावणेकर दाजी पराभूत
स्वर्गीय आनंदराव पाटील यांचे जावई व शशिकांत पाटील-चुयेकर यांचे दाजी प्रताप पाटील-कावणेकर यांचा १८२ मतांनी पराभव झाला. मात्र शशिकांत पाटील हे १९२३ मते घेऊन पाचव्या क्रमांकाने विजयी झाले.
मुरगूडकर-पाटील यांचा धक्कादायक पराभव
रणजितसिंह पाटील-मुरगूडकर यांनी निवडणुका जिंकल्या होत्या. मात्र आठव्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला.
दोघांचेही दावे फोल
सत्तारूढ आघाडीने २२०० मतांचा, तर विरोधी आघाडीने २२८० मतांचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात मतमोजणीनंतर दोन्ही आघाड्यांचा दावा फोल ठरल्याचे सिद्ध झाले.
डोंगळे याही निवडणुकीत नंबर वनच
मागील निवडणुकीत अरुण डोंगळे यांनी विजयी पॅनलमध्ये सर्वाधिक १७५५ मते घेतली होती. या वेळेलाही १९८० मते घेऊन ते पहिल्या क्रमांकावर राहिले.