गोकुळ चौकटी ०२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:13+5:302021-05-05T04:41:13+5:30
गोकुळ दूध संघात सत्ताधारी शाहू आघाडीकडून निवडणूक लढविलेल्या १२ पैकी १० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ अंबरिश ...

गोकुळ चौकटी ०२
गोकुळ दूध संघात सत्ताधारी शाहू आघाडीकडून निवडणूक लढविलेल्या १२ पैकी १० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ अंबरिश घाटगे, बाळासाहेब खाडे यांनाच विजय मिळविता आला. विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह रणजित पाटील-मुरगुडकर, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, उदय पाटील, सत्यजित पाटील, अनुराधा पाटील, विलास कांबळे, पी. डी. धुंदरे, विश्वास जाधव यांचा पराभूतात समावेश आहे. विश्वास पाटील व अरुण डोंगळे विरोधी आघाडीतून विजयी झाले. चंद्रकांत बोंद्रे यांच्या निधनानंतर एक जागा सुमारे चार वर्षे रिक्तच राहिली. ज्येष्ठ संचालक अरुण नरके, राजेश पाटील व जयश्री पाटील-चुयेकर हे रिंगणात नव्हते.
वारसदारांना नाकारले, स्वीकारले
गोकुळच्या प्रचारात वारसदारांवरून प्रचाराचे रणकंदन माजले होते, पण तेथेही मतदारांनी समतोल राखल्याचे दिसत आहे. महादेवराव महाडिक यांच्या सून शाैमिका महाडिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ, माजी अध्यक्ष अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके, के. पी. पाटील यांचा मुलगा रणजित यांना पदार्पणाची संधी देताना खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक, दिवंगत संचालक राजकुमार हत्तरकी यांचे पुत्र सदानंद, उदयसिंह पाटील यांचा मुलगा रवीश पाटील-कौलवकर या वारसदारांच्या मुलांना पराभवाचा झटका दिला. संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत यांना मात्र मतदारांनी पसंती देत गोकुळ उभारणाऱ्या संस्थापकाची आठवण ठेवली.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी
सर्वसामान्य कार्यकर्त्याना ‘गोकुळ’ची सोन्याची दारे उघडण्याची संधी या निवडणुकीच्या पहिल्यांदाच मिळाली आहे. रवींद्र आपटेसारखे मातब्बर पराभूत होत असताना फारसा करिश्मा नसलेले बयाजी शेळके, नंदकुमार ढेंगे, किसन चौगले, प्रकाश पाटील, एस. आर. पाटील, बाबासाहेब चौगले, अंजना रेडेकर या रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदारांनी गुलाल लावला.
नेत्यांचे अस्तित्वही राखले
गोकुळ दूध संघात लागलेल्या निकालावर नजर टाकल्यावर मातब्बरांना पाणी पाजताना ‘गोकुळ’च्या वाटचालीत वाटा असलेल्या नेत्यांना पुन्हा सत्तेची संधी देऊन का असेना त्यांचे अस्तित्व मान्य करण्याचा दिलदारपणा मतदारांनी दाखविला आहे. महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका, पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक बाळासाहेब खाडे, अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके यांना गोकुळवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दूध उत्पादकांनी दिली आहे.
अंबरिश काय करणार
गेल्या निवडणुकीत अंबरिश घाटगे विरोधी आघाडीतून विजयी झाले परंतु संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत ते सत्तारूढांच्या पंक्तीला जावून बसले होते. त्यामुळे आताही ते विजयी झाल्यावर पुढे काय करणार, याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. कागलच्या राजकारणात सध्या मुश्रीफ व संजय घाटगे यांचे मनोमिलन असल्याने अंबरिश सत्तारुढ गटाशी एकरूप होण्याची शक्यता जास्त आहे.
जुने चेहरे
विश्वास नारायण पाटील
अरुण डोंगळे
अंबरिश घाटगे
बाळासाहेब खाडे
नवे चेहरे
शशिकांत पाटील-चुयेकर
नविद मुश्रीफ
अजित नरके
अभिजित तायशेटे
किसन चौगले
रणजितसिंह पाटील
नंदकुमार ढेंगे
बाबासाहेब चौगले
कर्णसिंह गायकवाड
अमरसिंह पाटील
शौमिका महाडिक
एस. आर. पाटील
प्रकाश पाटील
चेतन नरके