दूध बंद आंदोलनात ‘गोकुळ’चा सहभाग नाही
By Admin | Updated: December 3, 2014 00:32 IST2014-12-03T00:28:15+5:302014-12-03T00:32:54+5:30
दिलीप पाटील : अतिरिक्त दुधाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा

दूध बंद आंदोलनात ‘गोकुळ’चा सहभाग नाही
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य दूध संघ कृती समितीने येत्या आठ डिसेंबरला पुकारलेल्या ‘दूध बंद’ आंदोलनात सहभागी होणे परवडण्यासारखे नाही, त्यामुळे या संपात ‘गोकुळ’ सहभागी होणार नाही, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष दिलीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. दूध संघाच्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने
गांभीर्याने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जागतिक बाजारपेठेत दूध पावडरचे दर घसरल्याने राज्यातील खासगी दूध संघांनी पावडरनिर्मिती बंद केली आहे. पावडरनिर्मिती बंद केल्याने गायीचे दूध खरेदीही अनेक संघांनी बंद केल्याने या अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने अतिरिक्त दूध खरेदी करून त्याची पावडर तयार करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य दूध संघ कृती समितीने केली आहे. त्यासाठी ८ डिसेंबरला राज्यातील दूध संघांनी संकलन बंद करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
‘गोकुळ’ संघ राज्यात अग्रेसर असून संघाचे दैनंदिन संकलन नऊ लाख लिटर आहे. संघ गायीच्या दुधाला २४.५०, तर म्हशीच्या ६.५ फॅट ला ३४.१० रुपये दर देतो. एक दिवसाचे दूध बंद केले तर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे ‘गोकुळ’ त्या दिवशी दूध स्वीकारणार असल्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.
अतिरिक्त दुधासह या व्यवसायासंबंधीच्या प्रश्नांमध्ये राज्य शासनाने लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी पत्रकातून केली
आहे.