गोकुळ अपात्र उमेदवारांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:56+5:302021-04-16T04:24:56+5:30
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक अर्ज छाननीत उमेदवारी अपात्र ठरलेल्या १४ जणांच्या याचिकेवर गुरुवारी विभागीय सहनिबंधक (दुग्ध) ...

गोकुळ अपात्र उमेदवारांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक अर्ज छाननीत उमेदवारी अपात्र ठरलेल्या १४ जणांच्या याचिकेवर गुरुवारी विभागीय सहनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे कात्रज येथील प्रशिक्षण हॉलमध्ये सुनावणी पूर्ण झाली. आता आज, शुक्रवारी किंवा सोमवारी निकाल दिला जाणार आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी ७६ जणांचे अर्ज छाननीत अपात्र ठरले होते. यातील या ३५ जणांनी अपात्र करण्याच्या प्रक्रियेवर हरकत घेतली होती. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सुनावणी घेऊन ही हरकत लगेच फेटाळलीदेखील होती. पण, या निर्णयाविरोधात ३५ पैकी १४ जणांनी विभागीय सहनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे याचिका दाखल केली होती. यावर याचिकेवर गुरुवारी शिरापूरकर यांनी सुनावणी घेतली. १४ याचिकाकर्त्यांपैकी प्रत्यक्षात भारती विजयसिंह डोंगळे, अजित पाटील (परिते), गंगाधर व्हसकुटे व यशवंत नांदेकर या चौघांच्यावतीने ॲड. प्रबोध पाटील यांनी उपस्थित राहून म्हणणे मांडले. इतर ११ जणांनी ई-मेलद्वारे म्हणणे सादर केले होते. या सर्वांनी सादर केलेल्या म्हणण्यावर गोकुळच्या वतीने ॲड. लुईस शहा यांनी उत्तर देत निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत विभागीय सहनिबंधक (दुग्ध) शिरापूरकर यांनी निर्णय राखून ठेवला असून, सोमवारपर्यंत निर्णय देण्यात येणार असल्याचे सांगितले.