गावाबाहेर जाताय, कुलूपबंद घर सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:41+5:302021-09-26T04:25:41+5:30

कोल्हापूर : दिवसा हेरगिरी करून कुलूपबंद घरे रात्रीच्या वेळी फोडणाऱ्या घरफोड्यांच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे ‘गावाबाहेर जाताय, तर ...

Going out of the village, take care of the locked house! | गावाबाहेर जाताय, कुलूपबंद घर सांभाळा!

गावाबाहेर जाताय, कुलूपबंद घर सांभाळा!

कोल्हापूर : दिवसा हेरगिरी करून कुलूपबंद घरे रात्रीच्या वेळी फोडणाऱ्या घरफोड्यांच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे ‘गावाबाहेर जाताय, तर कुलूपबंद घरही सांभाळा,’ असा निरोप शेजाऱ्यांना सांगण्याची पाळी आता सर्वसामान्यांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत तब्बल ८६९ कुलूपबंद घरे फोडून घरफोड्याच्या घटना घडल्या. तर त्यापैकी फक्त ४० टक्के घरफोड्या उघडकीस येऊन त्यातील चोरटे गजाआड झाले आहेत.

वाढती बेरोजगारी, त्यात कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. वाढती महागाई आणि हाताला काम नाही. परिणामी, जबरी चोऱ्या, किरकोळ चोऱ्या, घरफोड्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्याचा ताण पोलीस दलावर वाढू लागला आहे. घरफोड्यांसह चाेऱ्यांच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्यात तब्बल २८१० चोऱ्यांच्या घटना घडल्या. त्यापैकी ८२८ चोऱ्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले.

कोणत्या वर्षात किती घरफोड्या

वर्षे : घरफोड्या - उघडकीस

२०१९ : ३९८ - १८३

२०२० : २८७ - ९६

२०२१ (ऑगस्टपर्यंत) : १८४ - ४४

आठ महिन्यांत १८४ घरफोड्या तर ९१५ चोऱ्या

गेल्या आठ महिन्यांत तब्बल १८४ घरफोड्यांच्या घटना घडल्या. तर चोरीच्या ९१५ पैकी फक्त १९६ घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, चालू वर्षी कोरोना कालावधीत अनेक कुटुंबांना कोरोनाची बाधा झाल्याने ते उपचार घेत असताना त्यांच्या बंद घराची कुलपे तोडून त्यांच्याही घरी घरफोड्या झाल्या. तर महापुराचे पाणी शिरलेल्या कुलूपबंद घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. कोल्हापूर जिल्ह्यात महापुरात घरफोडीच्या तब्बल १४ घटना, तर शहरात ५ घटना घडल्या आहेत.

१४० घरफोड्यांचा तपास अद्याप सुरूच!

जिल्ह्यातील गेल्या आठ महिन्यांत झालेल्या घरफोड्यांपैकी तब्बल १४० घरफोड्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. तर अडीच वर्षांतील २३२ घरफोड्यांतील चोरट्यांचा तपास अद्याप लागला नसल्याने पोलिसांसमोर आव्हान वाढत आहे.

अनलॉकनंतर चोऱ्या वाढल्या

कोरोना कालावधीत लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत बहुतांश नागरिक घरीच राहिले. परिणामी, चोरट्यांनी घरांऐवजी बंद दुकानांना लक्ष्य केले. पण हळूहळू अनलॉक होईल तसे नागरिक घराबाहेर पडले, त्यामुळे चोरट्यांनीही दिवसा टेहळणी करून तीच कुलूपबंद घरे रात्रीच्या वेळी फोडली. अनेक ठिकाणी दिवसाही घरफोड्यांचे प्रकार झाल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Going out of the village, take care of the locked house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.