जोगासिंग घुमान यांचा २५ मे रोजी गौरव
By Admin | Updated: May 16, 2015 00:14 IST2015-05-16T00:14:17+5:302015-05-16T00:14:33+5:30
सन्मान राष्ट्रीय एकात्मतेचा : मुस्लिम समाज प्रबोधन संस्थेतर्फे आयोजन

जोगासिंग घुमान यांचा २५ मे रोजी गौरव
कोल्हापूर : पंजाबमधील सरवरपूर या खेड्यात भारत-पाकिस्तान फाळणीत पाडण्यात आलेल्या मशिदीची उभारणी करणाऱ्या जोगासिंग घुमान यांचा मुस्लिम समाजप्रबोधन संस्थेतर्फे गौरव करण्यात येणार आहे. येथील शाहू स्मारक भवनात सोमवारी
(दि. २५) सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार असून, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमास कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आदिल फरास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील,
अशी माहिती मुस्लिम समाजप्रबोधन
व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हुसेन जमादार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
जमादार म्हणाले, भारत-पाकिस्तान फ ाळणीदरम्यान १९४७ ला झालेल्या दंगलीत पंजाबमधील सरवरपूर या खेड्यातील मशीद दंगलखोरांनी पाडली होती. ही मशीद सरवरपूरमधील प्रगतिशील शेतकरी जोगासिंग घुमान यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये ग्रामस्थांनी बांधली व तेथील मुस्लिम समाजाच्या स्वाधीन केली. सरवरपूरकरांच्या या राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान करण्यासाठी जोगासिंग घुमान आणि रोधासिंग यांचा सन्मान करण्यात येणार आहे. घुमान यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे आहे. या पत्रकार परिषदेला मुस्लिम समाजप्रबोधन व शिक्षण संस्थेच्या संचालिका आयेशा शेख, भास्कर रेळेकर, सुंदर देसाई, गीता गुरव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घुमान आणि सरवरपूर
पंजाबमधील सरवरपूर हे सुमारे शंभर घरांचे खेडे. प्रगतिशील शेतकऱ्यांचे सधन गाव म्हणून सरवरपूरची ओळख आहे. या खेड्यात सुमारे दोनशे ट्रॅक्टर आहेत. १९४७ साली झालेल्या भारत-पाकिस्तान दंगलीमध्ये सरवरपूरमधील मशीद पाडण्यात आली होती. ही मशीद बांधण्याचा निर्णय येथील शीख समाजाच्या गुरुद्वार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार ही मशीद २००९ मध्ये बांधण्यात आली.