टाळ-मृदंगात पायी दिंड्या रवाना
By Admin | Updated: July 19, 2015 00:29 IST2015-07-19T00:29:08+5:302015-07-19T00:29:18+5:30
ओढ विठ्ठलाच्या भेटीला : भुरभुर पावसातही अमाप उत्साह

टाळ-मृदंगात पायी दिंड्या रवाना
कोल्हापूर : जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल... पांडुरंग... पांडुरंग... असा विठुरायांचा... त्याच्या जोडीला टाळ-मृदंगाचा गजर... अशा भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापुरातून पंढरपूरला पायी दिंड्या रवाना झाल्या. पावसाची भुरभुर असूनही त्यामध्ये न्हाऊन निघणाऱ्या शेकडो भक्तांचा अमाप उत्साह शनिवारी पहायला मिळाला.
पंढरपुरात भरत असलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भक्त जातात. यंदा सोमवारी (दि.२७) ही यात्रा होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरात भक्तांच्या दिंड्या रवाना होत आहेत. शनिवारी जिल्ह्णातून विठुरायाच्या गजरात अनेक दिंड्या निघाल्या. डोईवर फेटे, कपाळी बुक्का, गळ्यात माळ, हातात टाळ अशा रूपातील भाविक विठुरायाची भजने गात जात होते. महिलाभक्तांच्या डोईवर तुळशी होती. ठिकठिकाणी या दिंड्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत होत होते. दिवसभर पावसाची भुरभुर सुरू होती. तरीही भक्तांचा उत्साह अमाप असल्याने पावसाची तमा न बाळगता दिंड्या अंतर कापत होत्या. ठिकठिकाणी नागरिकांनी या दिंड्यांचे स्वागत करून खाद्यपदार्थ व फराळाचे साहित्य दिले.
फुलेवाडी येथील विठ्ठल पंथी सांप्रदायिक भजनी मंडळाच्या दिंडीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष व दिंडीप्रमुख महादेव मेढे, उपाध्यक्ष गजानन पाटील, सचिव अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक भाविकांची दिंडी सकाळी साडेआठ वाजता फुलेवाडी येथील दत्त मंदिर येथून निघाली. ताराराणी चौक येथील गीता मंदिर येथे नाश्ता व दुपारचे जेवण शिरोली येथे भाविकांनी घेतले. रात्री मुक्काम अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे राहणार आहे. शनिवारपर्यंत दिंडी पंढरपुरात पोहोचणार आहे. याशिवाय करवीर तालुक्यातील दोनवडे, केर्लेसह कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यांतील अनेक दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाल्या. यामधील शेकडो भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.(प्रतिनिधी)