मुलाखतीला आत्मविश्वासाने जा

By Admin | Updated: May 14, 2015 00:29 IST2015-05-13T23:43:10+5:302015-05-14T00:29:12+5:30

राजन नाईक : विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र; ‘लोकमत युवा नेक्स्ट’चे आयोजन

Go interview with confidence | मुलाखतीला आत्मविश्वासाने जा

मुलाखतीला आत्मविश्वासाने जा

कोल्हापूर : शिक्षणानंतर मुलाखत हे असे वळण असते, जिथून तुमच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. त्यामुळे मुलाखतीला आत्मविश्वासाने जा. तुमचे व्यक्तिमत्त्व, ज्ञान, संभाषण कौशल्य आणि नोकरीबद्दलचे गांभीर्य यांवर तुम्हाला मिळणाऱ्या संधी अवलंबून असतात. त्याचे सोने करायचे असेल, तर पूर्ण तयारीनिशी मुलाखत द्या... असा कानमंत्र राजन नाईक यांनी दिला.‘लोकमत युवा नेक्स्ट’ व ‘एलिक्झर’मार्फत शाहू स्मारक भवनमध्ये ‘हाऊ टू फेस इंटरव्ह्यू’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्जा यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी एलिक्झरचे केंद्र व्यवस्थापक नियाज काझी, ट्रेनर राजन नाईक, मार्केटिंग मॅनेजर स्वप्निल घाटगे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुलाखत देताना कोणत्या चुका करू नयेत, या छोट्याशा नाटकवजा सादरीकरणाने झाली. रणजित गायकवाड व अजिंक्य थोरात यांनी यात भूमिका बजावली. यावेळी राजन नाईक म्हणाले, ‘मुलाखतीला या’, असा फोन आला की तुम्ही आनंदी होता; पण तुमची मुलाखत घेणारी व्यक्ती आपल्या कंपनीसाठी योग्य अशा व्यक्तीच्या शोधात असल्याने ती जणू एका गुप्तहेराच्या भूमिकेत असते. त्यामुळे बाह्य व्यक्तिमत्त्वाबरोबरच तुम्ही मनाने कसे आहात, प्रामाणिकपणा, सचोटी, हजरजबाबीपणा, मार्केटिंग कौशल्य, तुमच्या सकारात्मक बाजू, नकारात्मक गोष्टी, आजवरच्या कामाचा अनुभव, आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन या सगळ्या बाजूंनी तुमची पडताळणी करीत असतो. मुलाखतीला जाताना नोकरी मिळाली, न मिळाली नाही तर जाऊ दे, असा आविर्भाव ठेवू नका, घाबरून जाऊ नका, तसेच अतिबडबडही करू नका. तुमच्या व्यक्तिमत्त्वातून ज्ञान आणि प्रामाणिकपणा मुलाखतकाराला जाणवला पाहिजे. दरम्यान, यावेळी काढलेल्या लकी ड्रॉमध्ये करण सावेकर, मयूर मोहिते, स्वप्नजा पाटील हे विजेते ठरले. (प्रतिनिधी)

मुलाखतीचा कानमंत्र असा
मुलाखतीत दुसरी संधी मिळत नाही; त्यामुळे स्वत:च्या कौशल्याचे मार्केटिंग (सादरीकरण) करा.
नोकरीबद्दल गांभीर्य बाळगून तयारी करा.
शैक्षणिक सर्टिफिकेट, निकाल, प्रमाणपत्र अशी कागदपत्रे सोबत घ्या.
नोकरीसंदर्भात प्रसिद्ध झालेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अनुभवावर आधारित उत्तरे द्या.
ज्या कंपनीत मुलाखत देण्यासाठी जात आहात, त्या कंपनीची पूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे.
४ घाबरून जाऊ नका, तसेच फार बडबडही नकोच.

Web Title: Go interview with confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.