निष्ठावंतांना संधी देणार
By Admin | Updated: May 11, 2015 01:06 IST2015-05-11T01:05:56+5:302015-05-11T01:06:42+5:30
प्रकाश आवाडे : इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले

निष्ठावंतांना संधी देणार
इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेशी नाळ जोडल्या गेलेल्या आणि कॉँग्रेस पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. याची जाणीव ठेवून कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
येथील शहर कॉँग्रेस समितीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालकपदी निवड झालेले कॉँग्रेसचे उपाध्यक्ष विलास गाताडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आवाडे बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा बॅँकेकडील उमेदवारी निवडीवेळी विविध घडामोडी घडल्या. त्यामध्ये आपणाला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. प्रामाणिक कार्यकर्त्याला प्राधान्याने संधी देऊन चांगल्या कामाची सुरुवात करण्यात यावी, असा हेतू त्यामागे होता आणि त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून गाताडे यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना विलास गाताडे म्हणाले, कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारण करीत असताना आपण नेहमीच समाजकारणाला व विधायक कामाला महत्त्व देऊ. यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, कामगार नेते शामराव कुलकर्णी, नगरसेवक शशांक बावचकर, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसंत मुळीक यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रणजित जाधव, कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, युवा नेते राहुल आवाडे, माजी नगराध्यक्ष अशोक आरगे, अशोकराव सौंदत्तीकर, धोंडीलाल शिरगावे, प्रा. शेखर शहा, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)