लसींची माहिती एक दिवस अगोदर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:37+5:302021-07-11T04:17:37+5:30
कसबा बावडा : आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयास भेट देऊन केंद्रावरील नागरिकांशी संवाद साधला. कोरोना ...

लसींची माहिती एक दिवस अगोदर द्या
कसबा बावडा :
आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयास भेट देऊन केंद्रावरील नागरिकांशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधात्मक लसींबाबत नागरिकांना आदल्या दिवशी योग्य माहिती द्या, त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी होणार नाही, अशा सूचना आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
आ. पाटील यांनी लसीकरण नियोजनाबद्दल महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आणि महापालिका अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन लसीकरण योग्य नियोजनाबाबत चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय येथे भेट देऊन लसीकरण नियोजनाची माहिती घेतली. लसीकरणासाठी आलेल्या लोकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या केंद्रावर लसीकरणाचे चांगले नियोजन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, शासनाकडून किती लस दिल्या जाणार?, कधी देणार? याबद्दल लोकांना आदल्या दिवशी माहिती द्यावी, लसीकरणाबाबत जनजागृती करावी. यामुळे, लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही. ज्या लोकांचे लसीकरण होऊन जास्त दिवस झाले आहेत, त्यांना प्राधान्याने लस देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच पावसाची शक्यता लक्षात घेता रांगेत थांबणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव, संजय लाड, योगेश निकम आदी उपस्थित होते.
फोटो : १० बावडा पाटील भेट
ओळ : सेवा रुग्णालय लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या लोकांशी आ. ऋतुराज पाटील यांनी संवाद साधला.