भाडेकरुची माहिती पोलिसांना द्या
By Admin | Updated: December 23, 2014 00:37 IST2014-12-23T00:37:01+5:302014-12-23T00:37:01+5:30
जानेवारीपासून नियमाची अंमलबजावणी : सात दिवसांची मुदत, अन्यथा घरमालकांवर कारवाई

भाडेकरुची माहिती पोलिसांना द्या
एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर
कोल्हापूर शहरात खून, दरोडे, चेन स्नॅचिंगचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर शाहू जकात नाक्याजवळ झालेल्या गावठी बॉम्बस्फोट प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. नुकत्याच पेशावर येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची नोंद पोलीस दप्तरी ठेवण्यासाठी प्रशासनाने व्यूहरचना आखली आहे. घरमालकांनी भाड्याने ठेवलेल्या कुळांची माहिती सात दिवसांच्या आत जवळच्या पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक राहणार आहे. माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, एक जानेवारीपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
पेशावर येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. घातपाती कृत्यांच्या अनुषंगाने पोलिसांना सतर्कता बाळगण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले आहेत. जिल्ह्यात खून, अपहरण, दरोडे, चेन स्नॅॅचिंगसारखा घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यातील आरोपी हे कोल्हापुरातच वास्तव्यास असून, ते भाड्याने घरे घेऊन नाव व पत्ता बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. नुकतेच करवीर पोलिसांनी एका चोरट्यास अटक केली होती. तो नागाळा पार्क येथे भाड्याने घर घेऊन राहिला होता. त्याने घरमालकाचेच घर सर्वप्रथम लुटले होते. उजळाईवाडी येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपीही भाड्यानेच या परिसरात राहण्यास आले होते. मध्यंतरी बिहार, उत्तर प्रदेश येथील हजारो तरुण कोल्हापुरात रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने स्थायिक झाले होते. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलन छेडत या परप्रांतीयांची हकालपट्टी केली होती. बाहेरून आलेल्या तरुणांचाच गुन्हेगारीमध्ये सहभाग असल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. त्याचबरोबर परजिल्ह्यांतून हद्दपार झालेले गुन्हेगार कोल्हापुरात वास्तव्यास येत असतात. महिन्याला पाच ते सहा हजार रुपये भाडे मिळत असल्याने घरमालकही त्यांची कोणतीही विचारपूस न करता त्यांना भाड्याने राहण्यासाठी खोली देतात आणि काही महिन्यांनी ते गुन्हेगार असल्याचे माहीत झाल्यानंतर मात्र पोलिसांसमोर हात वर करतात.
दरम्यान, कोल्हापूर हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने या ठिकाणीही अतिरेकी हल्ला होऊ शकतो. तसेच वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या माहितीची पोलीस दप्तरी नोंद असणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने घरमालकांना भाडेकरूची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास कळविणे बंधनकारक केले जाणार आहे.
बोगस कागदपत्रके जमा करून विविध कंपन्यांची दहा ते बारा मोबाईल सीमकार्डे वापरणारे काही महाभाग पोलिसांच्या निदर्शनास आले आहेत. या मोबाईल सीमच्या गैरवापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. याला चाप लावण्यासाठी आता नवीन सीम खरेदी करताना संबंधित कंपनीने अथवा डीलरने सीमकार्ड विकत घेणाऱ्या व्यक्तींची पोलीस ठाण्यास माहिती देऊन त्यांच्या शिफारशीनंतरच सीमकार्ड दिले जाणार आहे. पासपोर्टसाठी जी कार्यपद्धती वापरली जाते तीच आता सीमकार्डासाठी वापरण्यात येणार आहे.
घरमालकांना हे करावे लागणार
४घरमालकाचे नाव, पत्ता
४भाडेकरूचे नाव, पत्ता, किती लोक राहणार, त्या सर्वांचे फोटो
४आधार कार्ड, व्यवसायाची किंवा नोकरीची माहिती
४पोलीस ठाण्याकडून चौकशी केल्यानंतर मिळणार दाखला