भुदरगड संघाला १५ कोटी रुपये द्या
By Admin | Updated: November 25, 2015 00:44 IST2015-11-24T23:37:37+5:302015-11-25T00:44:38+5:30
चंद्रकांतदादांना निवेदन : संघ ऊर्जितावस्थेत येण्यासाठी बिनव्याजी भागभांडवलाची मागणी

भुदरगड संघाला १५ कोटी रुपये द्या
गारगोटी : भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी शासनाकडून बिनव्याजी भागभांडवल रुपये १५ कोटी रुपये परतीच्या मुदतीने द्या, अशा मागणीचे निवेदन भुदरगड संघाच्या नूतन संचालकांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिले आहे. यावेळी मंत्री पाटील यांनी भुदरगड तालुक्याची अस्मिता असणारा व शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असलेल्या भुदरगड तालुका संघास योग्य तो निधी देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे अभिवचन दिले. यावेळी निवेदन देताना माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, अध्यक्ष बाळ देसाई, बाजार समितीचे सदस्य नाथाजी पाटील, आलकेश कांदळकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, आय काँग्रेस तालुकाध्यक्ष शामराव देसाई या शिष्टमंडळाने निधी कशासाठी गरजेचा आहे, हे पाटील यांना पटवून दिले.निवेदनातील म्हटले आहे की : तालुका संघ शेतकऱ्यांचा आधार असून त्यामार्फत विविध प्रकारची खते, बी-बियाणे, रेशन धान्य वितरण करत असून संघ सध्या आर्थिकदृष्ट्या तोट्यात असल्याने त्याला ऊर्जितावस्थेतआणण्यासाठी शासनाकडून संघास शासकीय भागभांडवल म्हणून रुपये १५ कोटी बिनव्याजी १५ वर्ष मुदतीकरिता देऊन ही रक्कम दरवर्षी एक़ कोटी याप्रमाणे परत करण्याच्या अटीवर द्यावे. या रकमेतून शेतकऱ्यांसाठी खत उत्पादन वाढवून त्यांची शाखामार्फत विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक लागणारी खते, बी-बियाणे, औषधे, आदी शाखांमार्फत माफक नफा घेऊन सेवा देण्याचा संकल्प आहे. पाटगाव, कडगाव, वेसर्डे येथे गोडावून बांधण्याकामी, शेतकऱ्यांसाठी सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्यासाठी शेतकरी बझार गारगोटी, दारवाड, कडगाव, पुष्पनगर, वेसर्डे, कूर, पिंपळगाव, पाटगाव या ठिकाणी सुरू करण्यासाठी निधीचा वापर करणार असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)