सत्ता द्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो :ठाकरे
By Admin | Updated: August 22, 2014 00:52 IST2014-08-22T00:28:31+5:302014-08-22T00:52:28+5:30
शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन : संजय घाटगेंना कागलमधून उमेदवारीे

सत्ता द्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो :ठाकरे
कोल्हापूर : दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला, आता बारी महाराष्ट्राची. महाराष्ट्राची सत्ता द्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, गुरुवारी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते व माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हमीदवाडा (ता. कागल) येथील साखर कारखान्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ््याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश आबीटकर व मंडलिक यांचा नातू वीरेंद्र मंडलिक यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याच कार्यक्रमात मंडलिक यांनी संजय घाटगे यांची कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी मंडलिक व घाटगे यांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला. खासदार मंडलिक म्हणाले, लोकसभेचीच पुनरावृत्ती विधानसभेला होणार आहे. तुम्ही मला जसे आजपर्यंत पाठबळ दिले तसेच पाठबळ या पुढील वाटचालीत प्रा. संजय मंडलिक यांना द्या. जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करूया. संजय मंडलिक म्हणाले, मुश्रीफ यांनी दोनवेळा कारखान्याची निवडणूक लढविली; परंतु स्वाभिमानी जनतेने त्यांचा पराभव केला. आता शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून त्यांना कारखान्यांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही.’ संजय घाटगे म्हणाले, ‘कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नायनाट केल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. यावेळी आमदार सर्वश्री दिवाकर रावते, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे उपस्थित होते.