कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराजांचे नाव द्या
By Admin | Updated: August 1, 2015 00:10 IST2015-08-01T00:10:36+5:302015-08-01T00:10:36+5:30
समर्थकांचे धरणे : आश्वासनानंतर आंदोलन मागे

कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराजांचे नाव द्या
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी राजाराम महाराजांच्या जयंतीदिनी व्हीनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्यासमोर राजाराम महाराज प्रेमींतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.कोल्हापूर विमानतळाचा इतिहास पाहता, छत्रपती राजाराम महाराजांनी प्रथमत: कोल्हापूर संस्थानामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने, व्यापारवाढीसाठी व प्रजेच्या दृष्टीने विमानतळ असावा, या हेतूने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. आजच्या उजळाईवाडी विमानतळाच्या परिसरास पूर्वी ‘उदासीबुवाचा माळ’ असे संबोधले जात होते. या माळावर राजाराम महाराजांनी १९३०-३५ या कालावधीत विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७० एकर जमिनीचा परिसर हस्तगत केला होता. सिंगल इंजिन व्हिजन टाईप एअरक्राफ्ट अशा प्रकारची छोटी विमाने की जी एका पंख्यावर दुसरा लहान पंखा अशी चार पंख्यांनिशी होती, अशी विमाने कार्यरत होती. विमानतळाचे उद्घाटन ४ मे १९४० रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले. सन १९७८-७९ मध्ये या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यांनी दूरदृष्टी ठेवून केलेल्या कार्याच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी या विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव द्यावे, ही राजाराम महाराजप्रेमींची मागणी आहे. यासाठी राज्य शासन, महापालिका व जिल्हा परिषद यांचे ठराव झाले आहेत. तरीही अजून नामकरण झालेले नाही. या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. भरपावसात हे आंदोलन सुरू होते. दुपारी एकच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, श्रीकांत घाटगे यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य ते करू, असे लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्याचबरोबर आंदोलकांची दूरध्वनीवरून खासदार शेट्टी यांच्याशी चर्चा करून दिली. यावेळी शेट्टी यांनी भारतीय विमान प्राधिकरणाचे अधिकारी व विमान वाहतूक मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात उदयसिंह राजेयादव, वसंत सिंघण, आदित्य मैंदर्गीकर, अॅड. प्रताप जाधव, विजय जाधव, बाळासाहेब निकम, इम्रान शरीफ, दिलीप टोणपे, अशोक सडोलीकर, अशोक मानकर, ज्ञानेश पोतदार, मनवीर केसरकर, पीयूष चव्हाण, सोमेश्वर सोलापुरे, इम्रान शेख, मनीषा शिंदे, रंजना कारंडे, आदींसह राजाराम महाराजप्रेमी सहभागी होते. (प्रतिनिधी)