बहुमत द्या, युती-आघाडी नको : मोदी

By Admin | Updated: October 6, 2014 00:30 IST2014-10-06T00:29:35+5:302014-10-06T00:30:12+5:30

पवारांच्या खेळ्यांवर मोदी-शेट्टी चर्चा

Give majority, not coalition alliance: Modi | बहुमत द्या, युती-आघाडी नको : मोदी

बहुमत द्या, युती-आघाडी नको : मोदी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे, तिला आपले हित कशात आहे हे कळते. तिला आता युती व आघाड्यांच्या सरकारपासून मुक्तता हवी आहे. त्यासाठी तुम्ही भाजपला पूर्ण बहुमत द्या. मी महाराष्ट्राचा डंका देशात वाजवून दाखवितो, असे मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘माझ्या सभा महाराष्ट्रात होणार म्हटल्यावर काँग्रेसवाले हैराण झाल्याचे मला अमेरिकेत समजले. कालपासून माझ्या बीड येथून सभा सुरू झाल्या आहेत. त्यांना जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच काँग्रेसवाल्यांच्या अस्वस्थतेचे कारण आहे. आता महाराष्ट्रातील राजकीय हवा पालटली आहे. लोकांना दोन्ही काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारापासून सुटका हवी आहे. त्यामुळे लोक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारचा पाडाव केल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत राजकीय पंडित भाजपला कशा-बशा १८२ जागाच मिळतील असे अंदाज बांधत होते. त्यासाठी वृत्तपत्रांत रकानेच्या रकाने भरून लिहीत होते. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेतही सगळीकडे तसेच सांगितले होते, परंतु या
देशातील जनतेने त्या सर्वांचे अंदाज खोटे ठरविले व भाजपला पूर्ण बहुमत दिले. मी त्या राजकीय पंडितांना आताही हेच सांगतो की, महाराष्ट्रातही असेच होणार आहे. कारण गेल्या पंधरा वर्षांत या काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्र लुटून नेला आहे.’
मोदी म्हणाले, काँग्रेसवाले आणखी एका गोष्टीने फारच अस्वस्थ झाले आहेत. लोक मला म्हणतात, तुम्ही काँग्रेसकडून महात्मा गांधींनाही हिसकावून घेतले, परंतु गांधीजी हे ‘महात्मा’ होते. त्यामुळे त्यांना कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. काँग्रेसनेच गांधीजींना कधीच सोडून दिले आहे. काँग्रेसला राजकारणासाठी गांधीजी आता नकोच आहेत. त्यांचे छायाचित्र असलेल्या नोटा मात्र काँग्रेसवाल्यांना हव्या आहेत. मी सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाचा परवा अमेरिकेत जाऊन डंका वाजवून दाखविला. महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे. खासदार राजू शेट्टी म्हणाले, सभेचा प्रतिसाद पाहता निवडणुकीचा निकाल आजच लागला आहे. महाराष्ट्राला लागलेले दोन्ही काँग्रेसचे ग्रहण सुटणार आहे. काँग्रेसवाल्यांच्या सत्तेचा माज उतरवायचा निर्णय जनतेने घेतला आहे.  भाजपचे उमेदवार आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, महेश जाधव, केरबा चौगले व परशुराम तावरे तसेच स्वाभिमानी संघटनेचे जालंदर पाटील यांची भाषणे झाली. व्यासपीठावर उमेदवार सावकर मादनाईक, अमरसिंह पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, प्रमोद कदम उपस्थित होते. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सभेनंतर मोदी हेलिकॉफ्टरने बेळगावला रवाना झाले.
दरम्यान, मोदींचे सभास्थळी आगमन झाल्यावर भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे व नगरसेविका प्रभा टिपुगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांना स्थान होते, पण सभास्थळी घटक पक्षांचा एकही झेंडा नव्हता. दिवंगत माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा मुलगा विश्वविजय व माणिक पाटील-चुयेकर भाजपत प्रवेश करणार असे सांगण्यात येत होते, परंतु प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.

‘कोल्हापुरी चपला’ची गरज
‘कोल्हापुरी चप्पल’ प्रसिद्ध असून, त्याची आज देशाला आवश्यकता आहे. देशाची प्रगती वेगाने साधायची असेल तर कोल्हापुरी चप्पल पाहिजे, म्हणूनच त्याआधी ही चप्पल अवघ्या महाराष्ट्राने पायात घातली पाहिजे, असे मोदी म्हणाले.
मोदी यांनी कोल्हापूरविषयीच्या दोन आठवणी आपल्या भाषणातून जागविल्या. लहानपणी छोट्याशा गावात राहताना मला गुजरातमधील मोठ्या शहरांची नावेही माहीत नव्हती. त्यावेळी कोल्हापूर शहराबद्दल ऐकून होतो.
माझ्या गावातील अनेक कुटुंबे कोल्हापुरात गुळाचा व्यापार करण्यासाठी आली होती. त्यांच्या तोंडून कोल्हापूरविषयी ऐकले होतो, तेव्हापासून कोल्हापूरला मी ओळखतोय.
यापूर्वी एकदा येथे येऊन गेलो. त्यावेळी एका कोपऱ्यात सभा झाली होती. आज तर सभेला महासागर उसळला आहे. कोल्हापूरच्या जनतेकडून आशीर्वाद मिळतोय यापेक्षा सौभाग्य ते काय असू शकते? अशी भावनिक साद त्यांनी घातली.
मोदी येण्यापूर्वी उमेदवारांना बोलण्यास संधी दिली. त्यामध्ये महेश जाधव व केरबा चौगले यांची भाषणे दिशाहीन झाली. चौगले हे कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात काय विकासकामे केली हे सांगू लागल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी ओरडून भाषण थांबवा, असा आग्रह धरला.

दहशतमुक्त करणार
कोल्हापूर जिल्हा दहशतीच्या छायेखाली आहे. तो दहशतमुक्त करण्याचा विडा उचलायचा आहे. हे काम जनता निश्चित करील, असे आवाहन अमल महाडिक यांनी केले. कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांची यादीच त्यांनी सभेत वाचून दाखविली.

मैदानावर एलईडी स्क्रीन
नरेंद्र मोदी यांची सभा आणि भाषण सर्व जनतेला नीट ऐकता व बघता यावे म्हणून मैदानावर अनेक ठिकाणी एलईडी स्क्र ीन लावण्यात आल्या होत्या. सूर्यप्रकाशातही या स्क्रीनवर मोदींचे भाषण ऐकण्याचा आनंद जनतेने लुटला.

मुसक्या आवळणार : राजू शेट्टी
मूठभर कांदा व्यापाऱ्यांना हाताला धरून कांद्याचे दर पाडण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केले जात आहेत. भाजपचे सरकार आल्यावर अशा दर पाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. देशात साखरेचे उत्पादन जास्त झाले, असे भासवून निर्यात साखरेवरची सबसिडी हडप केली जात होती. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून ही सबसिडी हडप करण्याचे बंद पाडल्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या पोटात दुखायला लागले आहे. सामान्य माणूस मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहे. तोच आता चमत्कार करून शाहूंच्या या नगरीत परिवर्तन करणार आहे. त्यामध्ये वाळूमाफिया, साखरसम्राट सारे वाहून जातील, असे शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी परममित्र...
मंचावर बसलेले माझे परममित्र राजू शेट्टी अशीच मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केल्यावर श्रोत्यांनी टाळ््यांचा गजर केला. समतेचा विचार कृतीतून घालून देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या व छत्रपती ताराराणींच्या भूमीला अभिवादन करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

कडक बंदोबस्तात नरेंद्र मोदींचे स्वागत
निमंत्रित १२ जणांनाच विमानतळावर प्रवेश
कोल्हापूर : प्रत्येक वाहनाची होणारी कसून तपासणी, गुप्तचर यंत्रणा, केंद्र व राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि रस्त्यावर प्रत्येक ५० मीटरवर असलेला एक सशस्त्र पोलीस, अशा कडक बंदोबस्तात आज, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोल्हापुरात स्वागत झाले. दिल्लीतून परवानगी मिळालेल्या बाराजणांनाच उजळाईवाडी विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी प्रवेश दिला होता.
विमानतळ ते तपोवन मैदानावर सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात होता. या मार्गाला जोडणारे पर्यायी रस्ते अडथळे लावून बंद केले होते. मार्गावर प्रत्येक ५० मीटरवर एक सशस्त्र पोलीस होता. याठिकाणी जाणाऱ्या मोटारसायकली, चारचाकी यांची कसून तपासणी केली जात होती. विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दोन किलोमीटरच्या आवारात दुचाकी, चारचाकी वाहनांचे पार्किंग केले होते. विमानतळाचे मुख्य प्रवेशद्वार, इमारत व आतील परिसरात दिल्लीच्या विशेष पोलीस पथकाचा कडक बंदोबस्त होता. पोलीस, शासकीय यंत्रणा, आदींच्या वाहनांची कडक तपासणी करून खात्री झाल्यानंतरच त्यांना विमानतळाच्या इमारतीच्या परिसरात प्रवेश देण्यात येत होता. शिवाय, मोदींच्या स्वागतासाठी बारा निमंत्रितांना प्रवेश दिला होता. त्यांत महापौर तृप्ती माळवी, अ‍ॅड. संपतराव पवार, दिलीप मेत्राणी, नाथाजी पाटील, विजय जाधव, वसंत धोंड, महेंद्रसिंग, अखिलेश सिंग, सौमित्रसिंग, चंचलासिंग, आदींचा समावेश होता. संबंधित निमंत्रितांसमवेत आलेल्यांना सुरक्षेच्या कारणावरून बाहेर काढले.
तासगाव (जि. सांगली) येथील सभेनंतर दुपारी दीड वाजता पंतप्रधान मोदींचे कोल्हापुरात हेलिकॉप्टरमधून आगमन झाले. त्यांच्या सुरक्षेसाठी आणखी दोन हेलिकॉप्टर होती. विमानतळावर उतरल्यानंतर मोदींनी पाच मिनिटांत स्वागत स्वीकारले. कडक सुरक्षा असलेल्या ताफ्यातून मोटारीने ते सभा असलेल्या तपोवन मैदानाकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)

पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी विमानतळ मार्गावर दोन्ही ठिकाणी लोक थांबले होते. हेलिकॉप्टरच्या आगमनाचा आवाज येताच लोकांची गर्दी वाढली. यातील अनेकांनी त्यांच्या हेलिकॉप्टरचे आगमन, कडक सुरक्षेत निघालेला ताफा, आदी मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला. त्यांतील काहींना पंतप्रधान मोदी यांनी हात उंचावून अभिवादन केले.

पवारांच्या खेळ्यांवर मोदी-शेट्टी चर्चा
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय खेळ्या नेमक्या काय असतील, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली.
यावेळी त्यांनी मतदारसंघनिहाय परिस्थितीचा आढावा घेत राज्यात वातावरण चांगले आहे, गाफील राहू नका, जोर लावा, अशी सूचनाही शेट्टी यांना केली.
भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तपोवन मैदान येथे झालेल्या सभेत व्यासपीठावर मोदी यांनी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. शेट्टी यांच्या पाठीवर थाप मारीत पश्चिम महाराष्ट्राचे काय नियोजन केले, अशी विचारणा करीत आढावा घेतला.
शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यांचे धोरण काय राहणार, ते खेळ्या काय खेळतील, याविषयीची चर्चाही मोदी यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रात भाजप-स्वाभिमानी-रिपाइं-रासप महायुतीला चांगले वातावरण आहे. सभांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शंभर टक्के यश मिळणार आहे.
तरीही गाफील राहू नका, शेवटपर्यंत चिकाटी ठेवा, जोर लावा, अशा सूचनाही मोदी यांनी शेट्टी यांना केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Give majority, not coalition alliance: Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.