कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्र्ती सी. एल. थूल यांनी आज ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेबाबत माहिती घेऊन त्यांना दिलासाही दिला. न्यायमूर्र्ती थूल यांनी डॉ. किरवले यांच्या पत्नी कल्पना किरवले आणि कन्या अनघा किरवले यांचे सांत्वन केले. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करून देय असणारी मदत डॉ. किरवले कुटुंबीयांना तत्काळ देण्याची सूचना न्या. थूल यांनी केली. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे न्या. थूल यांनी डॉ. किरवले हत्येप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासमवेत बैठक घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती तसेच पोलिस तपासाबाबत माहिती घेतली. यावेळी डॉ. किरवले यांचे बंधू विष्णू किरवले तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हमाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९) नागरी हक्क संरक्षण व अॅट्रॉसिटीअंतर्गत घडलेल्या गुन्ह्णांचा आढावा जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता यांचे प्रतिनिधी अॅड. उदयसिंह जगताप, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, पोलिस निरीक्षक एस. एस. वाघमारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पासाहेब पालखे, नंदकुमार माने, अशासकीय सदस्य निरंजन कदम, राजू मालेकर, सहायक समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.२३ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार अत्याचाराच्या बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती, जमातींच्या व्यक्तींची हत्या किंवा मृत्यू झाल्यास ८ लाख २५ हजार रुपये त्यांच्या वारसांना अर्थसाहाय्य देय ठरते. त्यानुसार शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ५० टक्के रक्कम तत्काळ मंजूर होते. या शासन निर्णयानुसार डॉ. किरवले यांच्या वारसांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले. याबरोबरच जीवनज्योती विमा, जीवनसुरक्षा विमा याअंतर्गत खाते उघडले असल्यास ती रक्कमही तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले; तर सनी पोवार (पेठवडगाव, ता. हातकणंगले) या मृताच्या वारसांनाही उर्वरित २५ टक्के अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले. या बैठकीत सात प्रकरणांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले.चार लाखांचे अर्थसाहाय्य डॉ. किरवले हे अनुसूचित जातीतील असल्याने अॅट्रॉसिटीची कलमे लावून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याची संवेदनशीलता पाहता या प्रकरणात तत्काळ मदत देणे आवश्यक असल्याने मंगळवारी जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या वारसांना चार लाख १२ हजार ५०० रुपयाचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले.
किरवलेंच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत द्या
By admin | Updated: March 8, 2017 00:19 IST