शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:18 IST2021-04-29T04:18:09+5:302021-04-29T04:18:09+5:30
सेनापती कापशी:- दोन दिवसांपूर्वी चिकोत्रा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात वळवाचा पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान ...

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्या
सेनापती कापशी:- दोन दिवसांपूर्वी चिकोत्रा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात वळवाचा पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली.
चिकोत्रा खोऱ्यातील अर्जुनवाडा, नंद्याळ, मुगळी, करड्याळ आदी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय अधिकारी एस. बी. मगदूम, एस. बी. बुगडे, पी. ए. कांबळे, पी. एम. माळी, बी. आर. कुंभार उपस्थित होते. घाटगे म्हणाले की,आधीच कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे. शासनाने आता केवळ पंचनामे व कागदी घोडे नाचविण्यात फार वेळ न दवडता लवकरात लवकर त्यादृष्टीने कार्यवाही करावी व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
चौकट: शाहू साखरच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना दिलासा
समरजित घाटगे म्हणाले, गारपिटीमुळे ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील शाहू साखर कारखान्याकडे नोंद असलेल्या उसाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश शेती खात्यास दिले आहेत. नुकसानग्रस्त ऊसकरी सभासदांसाठी कारखान्यामार्फत कशाप्रकारे मदत करता येईल याची माहिती घ्या व कारखान्याच्या माध्यमातून निश्चितच नुकसानग्रस्त सभासदांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फोटो : मुगळी (ता.कागल) येथे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कलिंगड पिकाचे नुकसान झालेल्या सचिन चेचर यांच्या पिकाची पाहणी करताना समरजित घाटगे. यावेळी सागर मोहिते, दिलीप तिप्पे, संजय बरकाळे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.