२१८५ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्रे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:20+5:302021-05-09T04:25:20+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षण कायदा अमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची ...

२१८५ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्रे द्या
कोल्हापूर : मराठा आरक्षण कायदा अमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. याच काळामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी महाराष्ट्र राज्यात विविध विभागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, शासनाने कोविड या एकाच कारणास्तव पात्र २१८५ उमेदवारांना अद्याप नियुक्तीपत्रे दिलेली नाहीत. या नियुक्त्या तातडीने कराव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने ५ मे २०२१ रोजी दिलेल्या अंतिम निकालामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पूर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया या अबाधित राहतील, असा स्पष्ट उल्लेख आहे. सध्या लॉकडाऊन, कोरोना संकट, बेरोजगारी अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करून कष्टातून यश मिळवूनदेखील त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. पात्र उमेदवारांना आपल्या भविष्याची चिंता असून, या नियुक्तीबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत. उच्चशिक्षित असूनदेखील बेरोजगार असण्याची एक प्रकारची नकारात्मक भावना वाढत असून, या सर्वांना तातडीने नियुक्तीपत्र देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.