देणार शंभर रुपये, म्हणे क्रांतिकारी निर्णय
By Admin | Updated: February 25, 2015 00:38 IST2015-02-25T00:35:40+5:302015-02-25T00:38:13+5:30
सरकारचा कारभार : कच्च्या साखरेस अनुदान

देणार शंभर रुपये, म्हणे क्रांतिकारी निर्णय
कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर घसरल्याने राज्य शासन कच्ची साखर निर्यात करण्यास क्विंटलला शंभर रुपये देणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होऊनही त्यास मंजुरी मिळाली नाही. कारण कुठे माशी शिंकली हे माहीत नाही; परंतु हा प्रस्ताव पुढच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावात मात्र राज्य शासनाने हा निर्णय ‘क्रांतिकारी’ असल्याचे म्हटले आहे.देशांतर्गत बाजारातील साखरेचे भाव कोसळल्याने कारखानदारीस एफआरपी देतानाही घाम फुटला आहे. त्यांना थेट मदत करण्याऐवजी कच्च्या साखरेस अनुदान देण्याचा निर्णय केंद्राने १९ फेब्रुवारीस घेतला. केंद्र सरकार क्विंटलला ४०० रुपये देणार आहे; परंतु त्याचा अधिकृत आदेशही अद्याप निघालेला नाही. तोपर्यंत राज्य शासनाने क्विंटलला १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याचा रितसर प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सादर केला. मात्र, तो मागे ठेवण्यात आला.हा निर्णय झाला तरी कारखानदारांना त्याचा थेट फायदा फार कमी होणार आहे. फक्त उत्पादित साखरेपैकी काही साखर निर्यात होणार असल्याने त्याचा बाजारावर परिणाम होऊन साखरेचे दर वाढतील, असा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो; परंतु त्याचा आदेश होऊन अंमलबजावणी होईपर्यंत हंगाम अखेरच्या टप्प्यात येऊ शकतो.