चौदा दिवसांत ‘एफआरपी’ द्या
By Admin | Updated: November 25, 2015 00:45 IST2015-11-24T23:31:12+5:302015-11-25T00:45:22+5:30
शिवसेना : ‘चक्का जाम’चा इशारा; प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा

चौदा दिवसांत ‘एफआरपी’ द्या
कोल्हापूर : चौदा दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर महसुली जप्तीची कारवाई करा, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. कारखानदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असताना साखर आयुक्त बघ्याची भूमिका घेणार असतील तर कोल्हापूर जिल्ह्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
मागील थकीत एफआरपी किती, अशी विचारणा करत चालू हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळालेले नाहीत. कायदा काय सांगतो? संबंधितांवर कारवाई का केली नाही? अशी विचारणा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली. ज्यांनी चौदा दिवसांत एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत, त्यांचा लेखापरीक्षकांकडून अहवाल तयार करावा व त्यांच्या महसुली जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच कारखानदारांनी राजकारणासाठी कारखाने उद्ध्वस्त केल्याचा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला.
हंगामातील एफआरपी न देणाऱ्यांना गाळप परवाना दिलाच कसा? असा सवाल करत शुगरलॉबी सांगेल तसे साखर आयुक्त नाचत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. मंत्री समितीच्या निणर्यानुसार कारखान्यांना महिन्याची मुदत दिली आहे. त्या वेळेत एफआरपी न देणाऱ्यांवर आयुक्तांना दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केल्याची कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी सांगितले. चौदा दिवसांत एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल केले नाही तर आगामी काळात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा संजय पवार यांनी दिला. शुभांगी साळोखे, सुषमा चव्हाण, बाजीराव पाटील, भिकाजी हाळदकर, प्रकाश पाटील, संभाजी भोकरे, तानाजी आंग्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कर्जाचे व्याज हप्त्यानेच घ्या
साखरेच्या दराचे कारण सांगत एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या साखर कारखानदार व सरकारने आम्हाला हप्त्यावरच खते, बियाणे द्यावी. त्याचबरोबर आमचे पीक कर्जावरील व्याजही हप्त्यानेच घेणार का? असा संतप्त सवाल एका शेतकऱ्याने केला.
‘बिद्री’चा ५० हजारांचा बोनस?
‘एफआरपी’ची चर्चा सुरू असताना करंजिवणे (ता. कागल) येथील शेतकरी लक्ष्मण लाड यांनी ‘बिद्री’ कारखान्याने अपात्र कर्जमाफीतील बेकायदेशीर ५० हजारांची कपात केल्याची तक्रार केली. हा बघा ‘बिद्री’ने मला दिवाळीत ५० हजारांचा बोनस दिल्याची पावतीच सहसंचालकांना दिली. याबाबत रितसर अर्ज करा, त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सहसंचालक रावळ यांनी दिले.