पहिली उचल ३००० रुपये द्या!
By Admin | Updated: November 13, 2014 00:42 IST2014-11-13T00:34:24+5:302014-11-13T00:42:07+5:30
अखिल भारतीय किसान सभा : कोल्हापुरात ऊस परिषदेत राज्यव्यापी आंदोलन

पहिली उचल ३००० रुपये द्या!
कोल्हापूर : नवीन सरकारने नुकत्याच स्थापन केलेल्या ऊसदर नियामक मंडळाची बैठक शनिवारी (दि. १५) होत आहे. या बैठकीत ऊसदराची पहिली उचल ३,००० रुपये जाहीर करावी, असा ठराव आज, बुधवारी करण्यात आला. या बैठकीत जर हा दर जाहीर झाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेतर्फे देण्यात आला आहे.
रुईकर कॉलनी येथील महालक्ष्मी हॉल येथे अखिल भारतीय किसान सभेतर्फे पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक व ऊस परिषद झाली. यावेळी ऊसदराबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेण्यात आली. प्रमुख उपस्थितीत सभेचे अध्यक्ष कॉ. दादा रायपुरे (बुलडाणा) व जनरल सेक्रेटरी कॉ. किसन गुजर (नाशिक) यांची होती.
दादा रायपुरे म्हणाले, ऊसदर नियामक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत ऊसदर निश्चित करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वास्तव उत्पादक खर्च लक्षात घेतला पाहिजे. उत्पादन खर्चाच्या बाबींचा विचार करावा, तसेच किमान त्यांचा चरितार्थ चालावा याची दर जाहीर करताना काळजी घ्यावी. चांगला दर दिला तरच शेतकरी वाचेल. या बैठकीत जर दर कमी जाहीर करून शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास किसान सभेतर्फे राज्यव्यापी तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल. शुक्रवारनंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहीम हाती घेतली जाईल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली जातील.
किसान सभेचे मार्गदर्शक कॉ. प्रा. सुभाष जाधव म्हणाले, या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी कापूस दरासाठी आंदोलन केले होते; परंतु सत्तेत आल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या मागणीपेक्षा कमी दर जाहीर केला. अशीच काहीची परिस्थिी ऊस दराबाबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या ज्या संघटनांनी रंगराजन समितीच्या शिफारशींचे समर्थन केले आहे. त्या स्वीकारल्यास शेतकऱ्यांना उसाला २५०० रुपयांच्या पुढे दर दिला जाऊ शकत नाही. उलट स्वामिनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारून सरकारने हमीभाव ठरवून घेतला पाहिजे.
कॉ. उदय नारकर म्हणाले, ‘अच्छे दिन आनेवाले है...’ अशी स्वप्ने दाखवीत व आश्वासनांची खैरात करीत ज्या संघटना व पक्षाच्या नेत्यांनी जनतेची खोऱ्याने मते मिळविली. त्या लोकांवर आता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ ऊसदराच्या निमित्ताने आली आहे. निवडणुकीवेळी हे ऊसदराचे घोडेमैदान लांब होते. ते आता एकदम जवळ आले आहे. यावेळी जर आश्वासनांची पूर्तता केली नाही तर शेतकरी व जनता निश्चित त्यांना खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
तुळशीदास किल्लेदार (कागल)म्हणाले, खासदार राजू शेट्टी आता सरकारमध्ये असल्याने ते ऊसदराबाबत उघड भूमिका घेतील, असे वाटत नाही. उलट ते सरकार व साखर कारखानदारांचे हित पाहतील. लोकांची भ्रमनिरास होण्याची प्रक्रिया आता सुरू होईल. पुढील काळात एक पोकळी निर्माण होईल. ती भरून काढण्यासाठी किसान सभेतर्फे गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधला पाहिजे. यावेळी सिद्धाप्पा कलशेट्टी (सोलापूर), उमेश देशमुख (सांगली), माणिक अवघडे (कऱ्हाड), आप्पा परीट, प्रा. आबासाहेब चौगले (कोल्हापूर) यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिनिधी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील महालक्ष्मी हॉल येथे बुधवारी अखिल भारतीय किसान सभेची ऊस परिषद झाली. यावेळी अध्यक्ष दादा रायपुरे बोलत होते. शेजारी किसन गुजर, उमेश देशमुख, सुभाष जाधव, उदय नारकर, माणिक अवघडे उपस्थित होते.