अण्णा भाऊंना भारतरत्न द्या
By Admin | Updated: August 3, 2015 00:01 IST2015-08-03T00:01:12+5:302015-08-03T00:01:12+5:30
रामदास आठवले : खासदार फंडातून स्मारकाला २५ लाख देणार

अण्णा भाऊंना भारतरत्न द्या
वाटेगाव : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. तसेच खावाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या अभिवादन मेळाव्यात ते बोलत होते.आठवले म्हणाले, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थितीत देश स्वतंत्र होण्यासाठी शाहिरीतून, साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचे योगदान आहे. अशा या साहित्यरत्नाला २६ जानेवारीपर्यंत भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया व सर्व समाजाच्यावतीने सरकारकडे मागणी करणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनानेही केंद्र सरकारकडे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुुरस्कार द्यावा, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन केले. अण्णा भाऊंच्या स्मारकासाठी माझ्या खासदार फंडातून २५ लाखांचा निधी देऊ, असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच ते म्हणाले की, याकूब मेमनच्या फाशीसंदर्भात छोटा शकीलने केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. देशावर कोणी घाव घालत असेल तर, त्याचा डाव उलटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले, कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेता लोकशाहीर अण्णा भाऊंनी वास्तवाला धरून लिखाण केले. ते आयुष्यभर समाजासाठी कार्यरत राहिले. त्यांचे साहित्य सातासमुद्रापार पोहोचले.
राज्यसभा खासदार रामदास आठवले व लोकसभा खासदार राजू शेट्टी यांनी अण्णा भाऊ यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करावा. राज्यपाल व देशात एकाच विचाराचे सरकार आहे. म्हणून या मागणीला शासनाने व दोन्ही खासदारांनी न्याय द्यावा, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. प्रारंभी खासदार आठवले, आ. नाईक, सदाभाऊ खोत यांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी अण्णा भाऊ साठे व शंकर भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. त्यांची आरपीआय मातंग आघाडीच्या सचिवपदी निवड केल्याची घोषणा खा. आठवले यांनी केली. यावेळी वाळवा तालुका आरपीआयचे अध्यक्ष अरुण कांबळे व फकिरा साठे यांचा सत्कार खा. आठवले यांच्याहस्ते करण्यात आला.
शंकरराव साठे, जगन्नाथ ठोकळे, शहाजी कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वाटेगावचे उपसरपंच प्रमोद साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, किशोर तपासे, नवनाथ कांबळे, शहाजी कांबळे, मंगलराव म्हाळगे, बाळासाहेब बनसोडे, उत्तम कांबळे, अशोक गायकवाड, आप्पा वायदंडे, सुधीर कांबळे, प्रदीप साठे, आशिष जाधव, किरण साठे, दिनेश जाधव, एकनाथ चव्हाण, अजित साठे, विनोद जाधव आदी उपस्थित होते.
मेळाव्याचे आयोजन वाळवा तालुका आरपीआय, वीर फकिरा गु्रप, अण्णा भाऊ साठे लेझीम दांडपट्टा मंडळ व प्रबुद्ध गु्रप यांनी केले. (वार्ताहर)
आमदार फंडातून पाच लाख
महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. वाटेगाव येथील युतीच्या काळात उभारलेल्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी व सुशोभिकरणासाठी माझ्या आमदार फंडातून ५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली, आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.
अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिली.