अंगणवाड्यांना एक महिन्याची सुटी द्या
By Admin | Updated: April 2, 2015 00:38 IST2015-04-01T23:57:37+5:302015-04-02T00:38:45+5:30
पंचायत समिती सभेत ठराव : वर्ग उघडे असतात, पण विद्यार्थी नसल्यामुळे मागणी

अंगणवाड्यांना एक महिन्याची सुटी द्या
आजरा : इतर शाळांना सुटी असताना अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी नसते. वर्ग उघडे असतात, पण विद्यार्थी नाहीत अशी अवस्था सर्वत्र दिसत असल्याने इतर शाळांप्रमाणे अंगणवाडीच्या वर्गांनाही महिनाभराकरिता उन्हाळी सुटी द्यावी, अशा मागणीचा ठराव आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.आजरा पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती विष्णुपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीस माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व माजी आमदार सा. रे. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी सर्फनाला प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेताना प्रकल्पग्रस्तांची दादागिरी व आडमुठी भूमिका प्रकल्प पूर्णत्वास जाण्यातील प्रमुख अडथळा असून, यामुळे वेळोवेळी प्रकल्पाचे काम बंद केले जात असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला. खोराटवाडी पिकअप शेडचा प्रश्न उपसभापती दीपक देसाई यांनी उपस्थित करून बांधकाम दर्जेदार नसल्याने ते थांबवण्याची सूचना केले.हाजगोळी-कोवाड मार्गावर साकव बांधण्यात आला आहे, पंरतु त्यावरील रस्त्याची उंची वाढवण्याबरोबरच डांबरीकरण करणेही आवश्यक असल्याचे सदस्य तुळशीराम कांबळे व सभापती विष्णुपंत केसरकर यांनी स्पष्ट केले.आजरा शहरातील बचत गटांकरिता बांधण्यात येत असलेल्या ४७ लाख रुपयांच्या व्यापारी संकुलाचे काम रेंगाळले आहे. तीन वर्षे हे काम पूर्णत्वास गेले नसल्याने त्वरित बांधकाम पूर्ततेच्या हालचाली करण्याच्या सूचना करण्यात आल्या.मुंबईकर आजरावासीयांपासून एप्रिल व मे महिन्यांत जादा बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे एस.टी. आगाराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग शिक्षण विभाग यासह विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.बैठकीस उपसभापती दीपक देसाई, कामिना पाटील, अनिता नाईक, निर्मला व्हनबट्टे, गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
निंगुडगे ग्रामपंचायतीसाठी १८ अर्ज
आजरा : निंगुडगे (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत, तर सुळे ग्रामपंचायतीसाठी बुधवारअखेर दोन अर्ज दाखल झाले असून, उर्वरित पाच ग्रामपंचायतींकरिता एकही अर्ज दाखल झालेला नाही.
अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी केवळ निंगुडगे व सुळे येथे अनुक्रमे दहा व दोन अर्ज दाखल झाले आहेत. हत्तीवडे, महागोंड, सरोळी, किणे, होनेवाडी ग्रामपंचायतींकरिता एकही अर्ज दाखल झाला नाही. ७ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, ८ एप्रिल रोजी छाननी, १० एप्रिलला माघार, तर २२ एप्रिलला मतदान होणार आहे.