बालिका जन्मोत्सव प्रभावीपणे राबविणार
By Admin | Updated: December 4, 2014 00:52 IST2014-12-04T00:52:48+5:302014-12-04T00:52:48+5:30
विकास देशमुख : मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी उपक्रम

बालिका जन्मोत्सव प्रभावीपणे राबविणार
कोल्हापूर : मुलींची संख्या वाढावी यासाठी जाणीवजागृतीवर भर दिला आहे. मुलीला जन्म देणाऱ्या आई-वडिलांना अभिमान वाटावा म्हणून छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गावपातळीवरील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हा सन्मान करून बालिका जन्मोत्सव साजरा करावयाचा आहे. मुलींचे प्रमाण वाढावे, हाच विषय अग्रस्थानी ठेवावा, अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे आयुक्त विकास देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे म्हणून उपक्रम राबविला जात आहे. विविध पातळ्यांवर प्रयत्न केल्यामुळे मुलींची संख्या वाढत आहे. मात्र ही वाढ अपेक्षित नाही. प्रत्येक वेळी कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी जागृतीच्या माध्यमातून सकारात्मक बदलाचा शासनाचा प्रयत्न आहे.
भौतिक सुविधेसह शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकाऱ्यांना एक दिवस शाळेसाठी देण्याचा आदेश दिला आहे. केवळ प्राथमिक शाळेसाठी हा उपक्रम राबविला जात होता. आता माध्यमिक, आश्रमशाळेलाही अधिकारी भेट देतील. सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्णांत समाधानकारक पाऊस झाला आहे. सोलापुरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तिथे पाण्याची टंचाई तीव्रपणे जाणवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल ते जूनदरम्यानचा टंचाई कृती आराखडा महत्त्वाचा आहे. तो वेळेत तयार करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांना दिली आहे. (प्रतिनिधी)