कचरावेचक महिलेमुळे मुलीला मिळाला हक्काचा निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:09+5:302021-07-18T04:18:09+5:30
कोल्हापूर : तिचे वय अवघे तेरा... कोण देईल ते खायची, कुठेही झोपायची, कुणी देेईल ते कपडे घालायची, अशा विमनस्क ...

कचरावेचक महिलेमुळे मुलीला मिळाला हक्काचा निवारा
कोल्हापूर : तिचे वय अवघे तेरा... कोण देईल ते खायची, कुठेही झोपायची, कुणी देेईल ते कपडे घालायची, अशा विमनस्क अवस्थेत रस्त्यावर फिरणारी ती मुलगी कचरावेचक महिलेच्या सतर्कतेमुळे बालकल्याण संकुलामध्ये हक्काच्या निवाऱ्यात दाखल झाली. अवनि संस्थेने घेतलेल्या पुढाकारामुळे ही धडपड यशस्वी होऊन मुलीचे भविष्य सुरक्षित झाले.
कपिलतीर्थ भाजी मंडईजवळ कचरा वेचत असताना सारिका भोरे यांच्या नजरेस ती मुलगी दिसली. विमनस्क अवस्थेत बसलेल्या या मुलीची विचारपूस करून त्यांनी तिला अवनि संस्थेत आणले. तिथे तिला पोटभर जेवण घालून तिची सखोल चौकशी केली. ती बेळगावची आहे. कन्नडमिश्रित मराठी बोलते. आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर ती काकांकडे राहायची, पण त्यांनी तिचा सांभाळ केला नाही. आई-वडिलांचे सर्व सामान विकून तिला घराबाहेर काढले. ती तशीच भटकत भटकत कोल्हापुरात पोहोचली. गेले महिनाभर ती अशीच कोल्हापुरात फिरताना दिसत होती.
अवनि संस्थेने तिला बालकल्याण समितीसमोर हजर केले. समितीने पोलीस स्टेशनला माहिती देऊन तिची वैद्यकीय तपासणीही करून घेतली. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून ती कन्या निरीक्षणगृहात दाखल झाली. एका कचरावेचक महिलेच्या सतर्कतेमुळे ती बालकल्याण संकुलसारख्या सुरक्षित वातावरणात दाखल होऊन तिचे भवितव्या सुरक्षित झाले.
या कामात अवनिच्या अनुराधा भोसले, प्रकल्प समन्वयक म्हणून शिवकिरण पेटकर, अक्षय पाटील, अभिजित जाधव, मनीषा धामोने, चाईल्ड लाईनचे अस्मिता पवार, जुबेर शिकलगार यांनी विशेष कष्ट घेतले.