बालिका खून प्रकरणाचे धागेदोरे कोल्हापुरात
By Admin | Updated: July 25, 2016 00:34 IST2016-07-25T00:34:28+5:302016-07-25T00:34:28+5:30
आरेतील तरुणाची चौकशी : मध्यप्रदेशचे पोलिस तळ ठोेकून

बालिका खून प्रकरणाचे धागेदोरे कोल्हापुरात
कोल्हापूर : मध्यप्रदेश येथील दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणाचे धागेदोरे कोल्हापूरपर्यंत पोहोचल्याने मध्यप्रदेश येथील सोंडवा पोलिस ठाण्याचे विशेष पथक रविवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने आरे (ता. करवीर) येथील तुकाराम नावाच्या तरुणाकडे कसून चौकशी केली.
मध्यप्रदेशमधील ग्रामहातवी (जि. आलेझापूर) येथे २०१२ मध्ये सैन्यदलात अधिकारी असलेल्या हरसिंग दौडवा यांच्या दहा वर्षांच्या मुलीवर या नराधमाने अत्याचार करून गळा दाबून खून केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागा (सीबीआय)कडे देण्यात आला होता.
बालिका खून प्रकरणातील मारेकरी आजअखेर सापडलाच नाही. सोंडवा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. भूरया व हवालदार आर. पानसिंह सोलंकी हे याप्रकरणी तपास करीत आहेत. त्यांनी बालिकेचा ज्याठिकाणी खून झाला होता, त्या परिसरातील मोबाईल लोकेशन तपासले असता आरे (ता. करवीर) येथील तरुणाचे लोकेशन मिळून आले. मोबाईल नंबरवरून त्याचे नाव, पत्ता मिळवून एक विशेष तपास पथक रविवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने करवीर पोलिसांशी संपर्क साधून आरे येथील ‘तुकाराम’ नावाच्या तरुणाकडे कसून चौकशी केली. चौकशीतील तपशील सांगण्यास मात्र या पथकाने नकार दर्शविला.