मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना युवतीने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:20+5:302021-01-13T05:05:20+5:30
कोल्हापूर : रस्त्यावर पायी फिरायला गेलेल्या युवतीचा मोबाईल हिसाकवून घेऊन पळणाऱ्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांना संबंधित युवतीने भावाच्या मदतीने धाडसाने ...

मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना युवतीने पकडले
कोल्हापूर : रस्त्यावर पायी फिरायला गेलेल्या युवतीचा मोबाईल हिसाकवून घेऊन पळणाऱ्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांना संबंधित युवतीने भावाच्या मदतीने धाडसाने पकडले. यशवंत राजू पवार (वय २३, रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी रिंग रोड), प्रसाद किसन भिसे (२०, रा. बोंद्रेनगर रिंग रोड, शेवटचा बसस्टॉप, कोल्हापूर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला. ही घटना फुलेवाडी रिंग रोडवर मनोहर कोतवाल नगरनजीक घडली. युवतीने दाखवलेल्या धाडसाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवीन महेश यादव व त्याची बहीण (दोघेही रा. शिवशक्तीनगर, कोतवाल नगरनजीक, फुलेवाडी, रिंग रोड) हे दोघे सोमवारी सायंकाळी फिरायला पायी बाहेर पडले. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी बहिणीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तिने त्याचक्षणी त्यांपैकी एका युवकाचे जाकीट पकडून आरडा-ओरडा केला. त्याचवेळी तिच्यासोबत असणाऱ्या भावाने दुचाकी अडवून चोरट्यांनाही पकडले. त्वरित परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी चोरट्याला जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडील दुचाकीही जप्त केली.
नागरिकांनी चोपले
युवतीने चोरट्यांना पकडल्यानंतर तिची चोरट्यांशी झटापट झाली. तिने आरडा-ओरडा केल्याने भावाच्या व परिसरातील नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन करून दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले. युवतीच्या धाडसाचे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
फोटो नं. १२०१२०२१-कोल-यशवंत पवार (आरोपी)
फोटो नं. १२०१२०२१-कोल-प्रसाद भिसे (आरोपी)