कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी दिग्गजांची गर्दी
By Admin | Updated: August 7, 2014 00:22 IST2014-08-06T23:46:26+5:302014-08-07T00:22:46+5:30
विधानसभा निवडणूक : पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे यांनी नेले अर्ज

कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी दिग्गजांची गर्दी
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतून कॉँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढण्यास अनेकजण इच्छुक असून, त्यासाठी पक्षाकडे उमेदवारीच्या मागणीचे अर्ज नेणाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर प्रल्हाद चव्हाण आदी दिग्गजांचा समावेश आहे. प्रल्हाद चव्हाण यांनी आजच, बुधवारी उमेदवारी मागणी करणारा अर्ज भरला आहे.
जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची वेळ आल्यास उमेदवार शोधावयास लागू नयेत, म्हणून कॉँग्रेसने इच्छुकांना पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आतापर्यंत २५हून अधिक मान्यवर कार्यकर्त्यांनी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये करवीरमधून पी. एन. पाटील, कोल्हापूर दक्षिणमधून मंत्री सतेज पाटील, कोल्हापूर उत्तरमधून प्रल्हाद चव्हाण, सत्यजित कदम, इचलकरंजीमधून प्रकाश आवाडे, राहुल खंजिरे, हातकणंगलेतून जयवंतराव आवळे, राजू आवळे, चंदगडमधून भरमू सुबराव पाटील, अंजनाबाई रेडेकर, सदानंद हत्तरगी, पन्हाळ्यामधून अमर यशवंत पाटील, शिरोळमधून ‘गोकुळ’चे चेअरमन दिलीप पाटील, अनिल यादव, डी. सी. पाटील, कागलमधून परशुराम तावरे, राधानगरीमधून अरुणकुमार डोंगळे यांचा समावेश आहे.
उमेदवारी मागणीचे अर्ज ९ आॅगस्टपर्यंत पाच हजार रुपये अनामत रकमेसह कॉँग्रेस कार्यालयात जमा करायचे आहेत. त्यानंतर हे सर्व अर्ज महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीकडे पाठवून देण्यात येणार आहेत. तेथून पुढे अखिल भारतीय कॉँग्रेस महासमितीकडे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांच्या नावांची शिफारस केली जाणार आहे.
कोल्हापूर उत्तरमधून माजी आमदार मालोजीराजे निवडणूक लढणार नाहीत, अशीच चर्चा कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे कॉँग्रेस पक्षाशी निष्ठा असणाऱ्या शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा निर्णय घेतला आहे. १९९९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसकडून प्रल्हाद चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, त्यावेळी उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी त्यांची उमेदवारी रद्द करून महादेवराव आडगुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली.