‘जाएंट किलर’ अंजनाताईंची 'गोकुळ'मध्ये दमदार एंट्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:45+5:302021-05-05T04:40:45+5:30

गडहिंग्लज : सलग आठवेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले आजऱ्याचे ज्येष्ठ नेते बळीरामदादा देसाई यांचा पराभव करून 'जाएंट किलर' म्हणूनच ...

'Giant Killer' Anjanatai's strong entry in 'Gokul'! | ‘जाएंट किलर’ अंजनाताईंची 'गोकुळ'मध्ये दमदार एंट्री !

‘जाएंट किलर’ अंजनाताईंची 'गोकुळ'मध्ये दमदार एंट्री !

गडहिंग्लज : सलग आठवेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले आजऱ्याचे ज्येष्ठ नेते बळीरामदादा देसाई यांचा पराभव करून 'जाएंट किलर' म्हणूनच राजकारणात पदार्पण केलेल्या अंजनाताई रेडेकर या 'गोकुळ'च्या निवडणुकीतदेखील 'जाएंट किलर'च ठरल्या. 'गोकुळ'मधील त्यांच्या दमदार एंट्रीने गडहिंग्लज विभागातील मरगळलेल्या काँग्रेसला उभारी मिळाली आहे.

गेल्यावेळी 'गोकुळ'ची निवडणूक सर्वसाधारण गटातून लढून त्यांनी १२४६ मते घेतली होती. म्हणूनच पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना यावेळी महिला गटातून रिंगणात उतरवले होते.

सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांशी असलेले सौहार्दाचे संबंध आणि विरोधी आघाडीला मिळालेल्या 'पॅनेल-टू-पॅनेल' मतांमुळेच त्या यावेळीही 'जाएंट किलर'च ठरल्या.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांना विजयासाठी अखेरपर्यंत झुंजावे लागले. परंतु, अंजनाताईंची पहिल्या फेरीपासूनची निर्विवाद आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. म्हणूनच त्यांचे यश नजरेत भरणारे असेच आहे. अंजनाताईंचे पती केदारी रेडेकर हे शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते व मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते. १९९८ मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर मंत्रालयातील नोकरीचा राजीनामा देऊन त्या राजकारणात उतरल्या. १९९९ मध्ये त्यांनी गडहिंग्लजमध्ये वैद्यकीय आयुर्वेद महाविद्यालय व धर्मादाय दवाखाना, इंग्रजी माध्यमाची माध्यमिक शाळा व पतसंस्था सुरू केली. या संस्थात्मक कामाचाही त्यांना राजकारणात मोठा फायदा झाला. २००६ पासून सलग १५ वर्षे त्या आजरा साखर कारखान्याच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची संधीही त्यांना मिळाली. २००७ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष बळीरामदादांचा पराभव केला. तेव्हापासूनच त्यांचे नाव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आले.

दरम्यान, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली. त्या उत्तम कबड्डीपटू आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे हे त्यांचे माहेर, तर आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी हे त्यांचे सासर आणि शैक्षणिक-वैद्यकीय कामाच्या माध्यमातून गडहिंग्लज विभागासह जिल्हाभराच्या संपर्काचा त्यांना फायदा झाला.

--------------------

* अंजना रेडेकर : ०४०५२०२१-गड-०८

Web Title: 'Giant Killer' Anjanatai's strong entry in 'Gokul'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.