बाणाने दिग्गज घायाळ

By Admin | Updated: October 21, 2014 00:19 IST2014-10-21T00:00:51+5:302014-10-21T00:19:31+5:30

गतवेळच्या तुलनेत तीन जागांची भर घालत घवघवीत, दुप्पट यश

The giant guns with arrows | बाणाने दिग्गज घायाळ

बाणाने दिग्गज घायाळ

प्रवीण देसाई - कोल्हापूर --प्रस्थापितांना धक्का देत शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत सहा जागा काबीज करत जिल्ह्यात भगवा फडकाविला आहे. गतवेळच्या तुलनेत तीन जागांची भर घालत घवघवीत, दुप्पट यश यावेळी शिवसेनेने मिळविले आहे. तरुण, लढाऊ व सर्वसामान्य कार्यकर्ते अशी या विजयी उमेदवारांची ओळख आहे. शिवसेनेच्या ‘बाणा’ने दिग्गजांना घायाळ केले आहे.  -विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी शिवसेनेने चांगले उमेदवार दिले होते. स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यानंतरही शिवसेनेला उमेदवारांची वानवा भासली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील लाट व स्थानिक राजकीय संदर्भातून शिवसेनेने घवघवीत यश मिळविले. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीरमधून चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर या विद्यमान आमदारांसह कागलमधून माजी आमदार संजय घाटगे, राधानगरीमधून प्रकाश आबिटकर, शाहूवाडीतून सत्यजित पाटील-सरुडकर, चंदगडमधून नरसिंगराव पाटील, शिरोळमधून पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सेनापती उल्हास पाटील, इचलकरंजीमधून जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, कोल्हापूर दक्षिणमधून जिल्हाप्रमुख विजय देवणे असे तगडे उमेदवार शिवसेनेने दिले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रचंड चुरशीची झाली.
क्षीरसागर यांनी काँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांचा २२,४२१ मतांनी पराभव करीत ‘उत्तर’मध्ये पुन्हा ‘राजेश’ हेच दाखवून दिले. नरके यांनी काँग्रेसचे उमेदवार पी. एन. पाटील यांच्यावर ७१० मतांनी निसटता विजय मिळविला. गतवेळच्या तुलनेत यावेळी पाटील यांनी नरके यांना चांगलाच घाम फोडला. विजयासाठी त्यांना शेवटपर्यंत झुंजावे लागले.
डॉ. मिणचेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार जयवंतराव आवळे यांचा २९ हजार ३७० मतांनी पराभव केला.
आबिटकर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार के. पी. पाटील यांना ३९ हजार ४०८ इतक्या मतांनी पराभूत केले. त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी उघड पाठिंबा दिला तसेच तरुणाईने त्यांना डोक्यावर घेत निवडणुकीसाठी वर्गणी काढून दिली. सत्यजित पाटील-सरुडकर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व विद्यमान आमदार विनय कोरे यांच्यावर ३८८ मतांनी निसटता विजय मिळविला. उल्हास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा २० हजार ३३ मतांनी पराभव करत विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात सेनेचा भगवा फडकाविला. संजय घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी कडवी झुंज दिली. त्यांना ५ हजार ९३४ मतांनी मुश्रीफ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नरसिंगराव पाटील यांना ८ हजार १९९ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. जिल्हाप्रमुख असलेले विजय देवणे व मुरलीधर जाधव चमक दाखवू शकले नाहीत. देवणे यांच्या मतदारसंघात कुठलाही वरिष्ठ नेता फिरकला नाही. त्यांच्या सभा किंवा मेळावे या ठिकाणी झाले नाहीत. देवणे यांनी आपल्याच बळावर प्रचारयंत्रणा राबविली. (प्रतिनिधी)

Web Title: The giant guns with arrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.