‘वसंतदादा’ कारखान्याची मालमत्ता विकण्याचा घाट

By Admin | Updated: August 7, 2014 00:16 IST2014-08-06T22:51:25+5:302014-08-07T00:16:35+5:30

प्रादेशिक सहसंचालकांना निवेदन : सभासदांना विश्वासात घेतले नाही

Ghat to sell property of Vasantdada factory | ‘वसंतदादा’ कारखान्याची मालमत्ता विकण्याचा घाट

‘वसंतदादा’ कारखान्याची मालमत्ता विकण्याचा घाट

कोल्हापूर : सांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता सभासदांना विश्वासात न घेता विकण्याचा घाट घातला जात आहे. याची गंभीरपणे दखल घेऊन ही मालमत्ता विक्री करू देऊ नये, अशी मागणी आज, बुधवारी सभासदांच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरात प्रादेशिक सहसंचालक (साखर) वाय. व्ही. सुर्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
वसंतदादा साखर कारखाना १५ वर्षांपासून सातत्याने तोट्यात गेला आहे. कारखान्याचे २०१२-१३ व १३-१४ साली गाळप केलेल्या उसाचे बिलही थकविले आहे. तरतुदीनुसार साखर आयुक्तांनी साखर कारखान्यावर जप्ती आदेश नोंदविला आहे; परंतु प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करीत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संचालक व प्रशासकीय अधिकारी कारखान्याची मालमत्ता सभासदांना विश्वासात न घेता विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कारखान्याच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सर्व संचालक मंडळावर एका निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी. त्यानंतर संचालकांची सर्व मालमत्ता विकून सभासदांची देणी भागवावीत. याची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ghat to sell property of Vasantdada factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.