नेपाळच्या सीमेवरुन विवाहितेची सुटकापतीच्या त्रासाला कंटाळून गेली होती पळूनकोल्हापूर : नेपाळच्या सीमेवरुन प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेची जुना राजवाडा पोलिसांनी सुटका केली. सुमारे २२०० कि. मी. अंतर पार करुन या विवाहितेला सुखरुप कोल्हापूरला परत आणल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. संशयित अल्लाउद्दीन अन्सारी याचा यामागे काही वेगळा हेतू होता का? या दृष्टीने पोलिसांनी तपास केला असता काही आढळून आले नाही. अन्सारी याचे नेपाळ सीमेलगत कंटीछप्रा गाव आहे. तेथे ते राहत होते, अशी माहिती तपासी अंमलदार सुहास पोवार यांनी दिली.मोहिते कॉलनी, कळंबा येथील एकवीस वर्षाची विवाहिता पतीच्या त्रासाला कंटाळली होती. घराशेजारीच राहणारा टेलरकाम करणाऱ्या अल्लाउद्दीन अन्सारी याच्याशी तिची ओळख झाली, यातून ती २४ डिसेंबर २०१६ रोजी पळून गेली. तिच्या पतीने याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस हावलदार दिलीप सुतार आणि सुहास पोवार यांनी मोबाईल लोकेशनवरुन माहिती घेतली असता नेपाळ सीमेलगत कंटीछप्रा गावात ते दोघे असल्याचे समजले. त्यानुसार सुतार व पोवार रेल्वेने कंटीछप्रा गावी गेले. तेथे विवाहिता मिळून आली. पोलिस आल्याची चाहूल लागताच अन्सारी तेथून पसार झाला. विवाहितेला कोल्हापूरला आणले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तिला विश्वासात घेवून चौकशी केली असता तिने आपण स्वत:हून अन्सारी सोबत पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी सात दिवस सुमारे २२०० किलो मिटर अंतर पार करुन विवाहितेला परत आणले. तिच्या पतीने तिचा पुन्हा स्विकार केला असून पोलिसांनी पतीला दारु पिवून तिला त्रास देवू नको म्हणून दम दिला. (प्रतिनिधी)
नेपाळच्या सीमेवरुन विवाहितेची सुटका
By admin | Updated: March 8, 2017 13:05 IST